सरकारची घोषणा : लसींचा तुटवडा संपणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील आठवडय़ात रशियाची कोरोना लस ‘स्पुटनिक-व्ही’ उपलब्ध होणार असल्याची माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी दिली. रशियाकडून भारताला ही लस उपलब्ध होत असून येत्या एक-दोन दिवसात दुसरे विमान लससाठा घेऊन देशात दाखल होईल. त्यानंतर पुढील आठवडय़ात या लसींचे वितरण सुरू केले जाईल, असे केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.
पुढील आठवडय़ापासून लोकांना ‘स्पुटनिक-व्ही’ची लस दिली जाऊ शकते. तसेच जुलैपासून भारतात ही लस तयार केली जाईल, असेही पॉल यांनी स्पष्ट केले.
‘स्पुटनिक-व्ही’ लसीचा साठा घेऊन मे महिन्याच्या प्रारंभी रशियातून पहिले विमान हैदराबादमध्ये दाखल झाले होते. या ‘स्पुटनिक-व्ही’च्या माध्यमातून भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिटय़ूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. आता तिसऱया लसीच्या उपलब्धतेमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता तीन लसींमुळे तिसऱया टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येऊ शकतो. तसेच विदेशातून वैद्यकीय मदत प्राप्त होऊ लागल्यामुळे कोरोना विषाणूविरोधी लढय़ाला आणखी बळ मिळू शकते.
‘डब्ल्यूएचओ’ने मंजूर केलेल्या लसींची आयात शक्य
लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. राज्यांना लसखरेदीची अनुमती देण्यात आली असून डब्ल्यूएचओ, एफडीएने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात येऊ शकते. लसीसंबंधीचा आयात परवाना 2 दिवसात उपलब्ध होऊ शकतो. त्यानुसार काही राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढून लसी प्राप्त करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबरपर्यंत भारताकडे 216 कोटी डोस
मागील एक महिन्यादरम्यान कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेदरम्यान लसींच्या तुटवडय़ावरून मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 1 मेपासून 18 हून अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले असले तरीही लसींच्या तुटवडय़ामुळे याचा वेग खूपच कमी आहे. पण आता आगामी काही महिन्यांमध्ये लसींची कमतरता राहणार नाही. ऑगस्ट-डिसेंबर महिन्यादरम्यान देशाकडे 216 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
ऑगस्ट-डिसेंबरपर्यंत कोव्हिशिल्डचे 75 कोटी डोस उपलब्ध होतील. याचबरोबर कोव्हॅक्सिनचे 55 कोटी डोस, बायो ई सब युनिटमधून 30 कोटी डोस, जायडस कॅडिलाच्या लसीचे 5 कोटी डोस, सिरमच्या नोवावॅक्सचे 20 कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेसल व्हॅक्सिनचे 10 कोटी डोस, जिनोवा एमआरएनए लसीचे 6 कोटी डोस आणि स्पुतनिकचे 15.6 कोटी डोस उपलब्ध असतील असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.
35.6 कोटी डोसची खरेदी
देशात आतापर्यंत कोरोना लसीचे सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत हा आकडा 26 कोटी आहे. भारत याप्रकरणी जगात तिसऱया क्रमांकावर आहे. देशात 13 टक्के लसीकरण झाले आहे. दुसऱया लाटेनंतरही 17 कोटींचा टप्पा आम्ही सर्वात अवघड काळात पूर्ण केला आहे. सध्या 35.6 कोटी डोसच्या खरेदीचा निर्णय झाला आहे. भारत सरकारने 12 कोटी डोस प्राप्त केले आहेत. 16 कोटी डोस राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांनी मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.









