शेवटच्या टप्प्यातील निर्बंधाने नाराजी : प्रशासनाच्या निर्णयाला मूर्तिकारांचा विरोध
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव जसजसा जवळ येईल तसतसे प्रशासनही प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींवर निर्बंध घालतानाचे चित्र मागील काही वर्षांपासून बेळगावात पहायला मिळत आहे. यावषीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तींवर निर्बंध घालण्याचा विचार सुरू केला आहे. परंतु गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपला असताना प्रशासनाच्या या निर्णयाला मूर्तिकारांचा विरोध होत आहे. आधीच कोरोनामुळे होरपळलेले मूर्तिकार या नव्या निर्णयाने हतबल झाले आहेत.
मुंबई-पुण्यानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव बेळगावमध्ये साजरा होतो. 10 ते 15 फुटाच्या नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती हे येथील गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. परंतु काही वर्षांपासून उंचीवर मर्यादा आल्यानंतर आता पीओपी मूर्तींवर निर्बंध घातले जात आहेत. परंतु पीओपीविना सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करणे अशक्मय आहे. याचा विचार प्रशासन केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वर्षांपूर्वी बेळगावच्या मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती तयारदेखील केल्या. परंतु बाहेरील राज्यातून स्वस्त दरात पीओपी मूर्ती शहरात विक्रीस ठेवल्याने स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती विक्री झाल्या नाहीत. यामुळे स्थानिक मूर्तिकारांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
स्थानिक मूर्तिकारांवरच निर्बंध का?
मूर्तीकाम करणाऱयांची संख्या आधीच दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही कलाच लोप पावेल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन एकीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध करते आणि दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात परराज्यातून शेकडो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दाखल होतात. या तयार मूर्ती अत्यंत कमी दराने विक्री होत असल्याने मंडळेही त्या खरेदी करतात. त्यामुळे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे स्थानिक मूर्तिकार मात्र भरडला जात आहे. त्यामुळे मूर्तीकामापेक्षा इतर व्यवसाय परवडेल, असे म्हणण्याची वेळ मूर्तिकारांवर आली आहे.
मूर्तिकारांची बाजूही समजावून घेणे आवश्यक

प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु मूर्तिकारांची बाजूही समजावून घेणे आवश्यक आहे. केवळ स्थानिक मूर्तिकारांवरच कारवाई होते व शेवटच्या टप्प्यात परराज्यातून शेकडो गणेशमूर्ती बेळगावमध्ये दाखल होतात. अवघे दोन महिने शिल्लक राहिलेले असताना निर्बंध घातल्यास बेळगावमध्ये गणेशमूर्ती अपुऱया पडतील, असे मनोहर पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
मनोहर पाटील (अध्यक्ष-बेळगाव मूर्तिकार संघटना)
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाला विरोध

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्या तयार होणे शक्मय आहे का? याचा विचार प्रशासनाने करावा. बेळगावमध्ये कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत असल्याने प्रदूषणाचा मुद्दा उद्भवत नाही. मातीची चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती तयार करणे अशक्मय आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाला आमचा विरोध राहील, असे मूर्तिकार अशोक जाधव यांनी सांगितले.
–अशोक जाधव (मूर्तिकार)









