देवकल फाटा ते कास पठार दरम्यान डांबरीकरण सुरु
प्रतिनिधी/ कास
सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासुन प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र सध्या ठेकेदार शासनाचे नियम धाब्यावर बसवून भर पावसाळ्यात रस्त्याचे डांबरीकरण करून बहुंताश काम पुर्णत्वाकडे नेताना दिसत आहे. भर पावसाळ्यात डांबरीकरण करण्यास परवानगी नसतानाही हे काम जोरात सुरु असल्याने या नियमबाह्य दर्जाहिन कामाला बांधकाम विभागाच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱयांचा वरदहस्त लाभला असा सवाल निर्माण होत आहे.
सातारा-कास रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासुन सुरु आहे. बहुतांशी काम उन्हाळ्यात झाले असले तरी उर्वरीत देवकल फाटा ते पारांबे ते कास पठार या 3 ते 4 किलो मिटर अंतरावर गेले वीस ते पंचवीस दिवस डांबरीकरणाचे काम भर पावसात बांधकाम अधिकाऱयांच्या डोळ्यादेखत सुरु आहे. तर रविवार व सोमवारी हेरीटेज वाडी ते घाटाई फाटा या पटय़ातील डांबरीकरणाचे काम सुरु होते.
15 मे नंतर डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरु होणार असल्याने केले जात नाही. मात्र, सध्या कास परिसरात पावसाच्या सरी कोसळत असताना जून महिन्याच्या अखेरीस हे काम सुरु आहे. या भर पावसात दर्जाहिन डांबरीकरणाचे थर चढवून मलमपट्टी लावण्याचे काम जोमात सुरू असल्याने ठेकेदारांना कोण पाठीशी घालून कोण परवानगी देत आहे. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विचारणा करावी, अशी मागणी होत आहे.









