तेराशेहून अधिक लोकांना एनडीआरएफकडून जीवदान
डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 46 जणांचा बळी गेला आहे. केरळप्रमाणेच उत्तराखंडमध्येही पावसाने रुद्रावतार धारण केला असून विविध ठिकाणी भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या आहेत. घरे, रस्ते आणि पूल कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या असून ढिगाऱयांखाली काही लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून मदत व बचावकार्य सुरू असून गेल्या दोन दिवसात तेराशेहून अधिक लोकांना वाचविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.
गेल्या काही वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये कोसळणाऱया ढगफुटीसदृश पावसानंतर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बुधवारी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी मार्ग बदलले आहेत, गावांना जोडणारे लहान-सहान पूल कोसळले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पूरग्रस्त जिल्हय़ांमध्ये अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. बुधवारी दुपारपासून पाऊस ओसरल्याने मदत व बचावकार्याला गती आली आहे. रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आम्ही सुरक्षित स्थळी आणत आहोत. चारधाम यात्रेच्या ठिकाणी देखील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय, स्थानिक पातळीवर बचाव आणि दुरुस्ती कार्य तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱयांना तातडीने 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पूर्व भारतातही पावसाचा जोर
दक्षिण आणि उत्तर भारताप्रमाणेच पूर्व भारतातही पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नद्या-नाल्यांनाही पूर आला असून शेती-भातीचेही नुकसान झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. शेतकऱयांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके पावसामुळे जमिनीसपाट झाली आहेत. काही भागात घरे कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत.









