हुतात्मा उद्यानातील अग्निसुरक्षा केंद्र बनले भंगाराचे आगार : सदरबाजार येथील केंद्राची परिस्थिती बिकट
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून तीन अग्निसुरक्षा केंद्रे 2014 च्या दरम्यान उभारण्यात आली. त्यातील दोन अग्निसुरक्षा केंद्रे ‘शो पिस’ बनली आहेत. तर एक केंद्र हे सध्या वापरात आहे. दोन केंद्रापैकी हुतात्मा स्मारकाजवळील अग्निसुरक्षा केंद्र हे भंगार ठेवण्याचे केंद्र बनले आहे तर सदरबाजार येथील दगडी शाळेच्या पाठीमागे असलेले केंद्र तर तर कोणाला ज्ञातही नाही अशी परिस्थिती आहे. सातारा शहराची हद्दवाढ होणार हे अपेक्षित धरुन दि. 9 आक्टोबर 2011 मध्ये अग्निशामक विभागाचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने हालचाली झाल्या. त्यावेळी हुतात्मा स्मारक येथील पालिकेच्या मोकळय़ा जागेत अग्निसुरक्षा केंद्राची इमारत उभी करण्यात आली. त्यानंतर 2014 रोजी त्यामध्ये आणखी सुसज्ज अशी इमारत व पाण्याची टाकी इतर बांधकाम करुन त्याचेही उद्घाटन करण्यात आले. परंतु तेव्हापासून हुतात्मा स्मारक येथील अग्निसुरक्षा केंद्राला पाण्याचे कनेक्शन नसल्याने ते शोपिस बनले आहे. आजुबाजूला आरोग्य विभागाच्या भंगारातील कचरा कुंडय़ा आणून टाकल्या आहेत.









