प्रतिनिधी / मडगाव
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्नाटकातील कुमठा येथील एका चोरटय़ाला मडगावात अटक केली आहे.
लॉकडावन असल्यामुळे सध्या अनेक रेल गाडय़ा मडगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात उभ्या केलेल्या आहेत. या रेल गाडय़ात कर्मचारी नसल्याचे पाहुन कटगोल -कुमठा येथील शेखर बीडु गौडा (28) चोरी करण्याच्या हेतुने कोकण कन्या एक्सप्रेस रेल्वेत चढला. त्याच्याकडे मोठी हातोडी, शिडी, सुरा, लोखंडी सळई यासह व इतर काही हत्यारे होती.
मडगावात पार्क करुन ठेवलेल्या या रेल्वेच्या जनरेटर रुममध्ये काही महत्वाच्या वस्तूंची चोरी करण्याचा या आरोपीचा बेत होता. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्ष जवानामुळे हा चोरटा या जवानांच्या हाती लागला. चोरी करण्याच्या हेतुने आपण या रेलगाडीत चढलो होतो अशी कबुली या आरोपीने जवानाना दिली.
त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानी या संशयित आरोपीला कोकण रेल्वे पोलिसांच्या हाती दिले. रेल्वे पोलिसांनी या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या 457, 380, 511 कलमाखाली तसेच रेल्वे कायद्याच्या 251 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.









