88 टक्के काम पूर्ण : उर्वरित लाभार्थ्यांना नोंदणीसाठी आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत रेशन वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी ई-केवायसीचे काम (बायोमेट्रीक ठसे) सुरू ठेवण्यात आले आहे. संबंधित रेशन दुकानातून ई-केवायसी सुरू असून संबंधितांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी खात्यामार्फत ई-केवायसी मोहीम राबविण्यात येत आहे. गतवषी कोरोनामुळे या मोहिमेत खंड पडला होता. मात्र यंदा पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून ई-केवायसी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान चारवेळा ई-केवायसीच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात 88 टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या ई-केवायसीसाठी बायोमेट्रीक ठसे घेतले जात आहेत.
कोरोनाकाळात गोरगरीब जनतेला वाढीव रेशन पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान नोव्हेंबरनंतर केंद्र सरकारचा अतिरिक्त रेशन पुरवठा बंद होणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना केवळ राज्य सरकारतर्फे रेशनपुरवठा केला जाणार आहे. जिल्हय़ात 10 लाख 58 हजार 233 बीपीएल लाभार्थी तर 68 हजार 945 अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या आहे. यामध्ये 88 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली असून उर्वरित लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सुरू ठेवली आहे.









