प्रतिनिधी/ सातारा
खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून पाण्यात बुडाल्याने एका तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोनगाव (ता. सातारा) येथे घडली. चिनू यालाप्पा दौडमणी (वय 3 वर्षे) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यालाप्पा दौडमणी (रा. ओवीनआळी, जि. विजापूर, कर्नाटक) हे अपल्या कुटुंबीयांसोबत सध्या सोनगाव (ता. सातारा) येथील विटभट्टीवर कामास आहेत. त्यांना चिनू हि तीन वर्षाची मुलगी होती. सोमवारी दौडमणी कुटुंबीय नेहमीप्रमाणे विटभट्टीवर काम करत होते. तर त्यांची मुलगी चिनू हि तेथेच आसपास खेळत होती. दुपारी 12.15 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास चिनू तेथेच भरुन ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत खेळता-खेळता पडली. ती बादलीत पडली असताना तिचे डोके बादलीत खालच्या बाजुला असल्याने बादलीतील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. मुलीचे पालक काम करण्यात व्यस्त असल्याने तसेच मुलगी जवळपासच खेळत असल्याने पालकांच्या हि गोष्ट लवकर लक्षात आली नाही. बराच वेळ मुलीचा आवाज न आल्याने पालकांनी पाहिले असता मुलगी पाण्याच्या बादलीत बुडाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. तत्काळ मुलीला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असाता तीचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.









