गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
वार्ताहर/ कराड
कोरोना संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती बरी नसतानाही शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी समतोल निधी देणारा अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सातारा जिल्हय़ासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर पाटण तालुक्याच्या विकासासाठी 107 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षी आलेल्या कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचे मोठय़ा प्रमाणात कररूपी उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होईल गृहीत धरून हा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जीएसटी व अन्य कर रुपाने सुमारे 60 हजार कोटी रुपयांचे येणे आहे. मात्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाचा समतोल रहावा या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.
या अर्थसंकल्पात सातारा जिल्हय़ाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्हय़ातील रखडलेले मोठे पूल व रस्त्यांसाठी निधीची तरतूद केली आहे. पाटण तालुक्यातील रस्त्यांसाठी 56.30 कोटी, पुलांसाठी 38 कोटी, प्रशासकीय इमारतीसाठी 11 कोटी 77 लाख व न्यायालयाच्या इमारतीसाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी…
इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी घर ते शाळा-महाविद्यालयापर्यंत मोफत एसटी प्रवासाची सोय करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला 1500 सीएनजी बसेस देणार आहे. यामुळे मुलींचे शिक्षण आणखी सोईचे होणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
गर्दी टाळण्यासाठी कडक कारवाईचे आदेश…
सातारा जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचा जोर वाढत आहे. यासाठी अंशतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. विनामास्क नागरिकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत आहेत. मात्र अद्याप प्रशासकीय कार्यालये, मंडई, बाजारपेठा आदी ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी आणखी कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.