वार्ताहर/ आबलोली
गुहागर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या पाचेरीआगर-काजरोळकरवाडीकडे जाणाऱया रस्त्याची दूरवस्था झालेली असतानाच पावसामुळे ओहोळाचे पाणी रस्त्यावर येऊन मोठे चर पडले आहेत. यामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने या मार्गावरील एसटी वाहतूक बंद पडली आहे.
हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या मार्गावरून सध्या एसटीसेवा बंद नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पावसामुळे रस्त्याची दूरवस्था झाल्याचे संबंधित विभागाला कळवण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्यक्ष पाहणीसाठीही कोणी न आल्याने अखेर ग्रामस्थांनीच प्रशासकीय मदतीची वाट न पाहता आबलोली येथून जेसीबी मागवून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्त्यावर पडलेले चर भरण्यात आले. तसेच दगड-माती बाजूला करण्यात आली असून गटारे खोदण्यात आली. ओहोळाचे पाणी पावसात पुन्हा रस्त्यावर येऊ नये म्हणून आवश्यक ती बंदस्ती करण्यात आली. मात्र आता पावसामुळे पुन्हा नवी समस्या उभी ठाकली आहे.









