वृत्तसंस्था/ कराची
झिंबाब्वेचा क्रिकेट संघ सध्या पाकच्या दौऱयावर आला असून या दोन्ही संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळविल्या जाणार आहेत. वनडे मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत शुक्रवारी होणार असून या सामन्यासाठी पाकचा 15 जणांचा संघ घोषित केला आहे. पाक निवड समितीने फलंदाज हैदर अली आणि नवोदित अब्दुल्ला शफीक यांना वगळले आहे.
या वनडे मालिकेसाठी बाबर आझमकडे पाकचे नेतृत्व सोपविण्यात आले असून उपकर्णधार शदाब खान दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याचप्रमाणे अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीज आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद हेसनेन यांनाही वगळण्यात आले आहे. पीसीबीने वनडे आणि टी-20 मालिकेतील सर्व सामने रावळपिंडीमध्ये घेण्याचा निर्णय यापूर्वीच सूचित केला आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्धच्या मालिका भरविण्यासाठी पीसीबीचे प्रयत्न चालू आहेत.
पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), इमामुल हक, अबीद अली, फक्र झमान, हॅरीस सोहेल, मोहम्मद रिझवान, इफ्तिकार अहमद, खुशदील शहा, फईम अश्रफ, इमाद वासीम, उस्मान कादीर, वहाब रियाज, शाहीन शहा आफ्रिदी, हॅरीस रौफ, मुसा खान.
उभय संघातील पहिला वनडे सामना 30 ऑक्टोबर, दुसरा वनडे सामना 1 नोव्हेंबर, तिसरा वनडे सामना 3 नोव्हेंबर, पहिला टी-20 सामना 7 नोव्हेंबर, दुसरा टी-20 सामना 8 नोव्हेंबर, तिसरा टी-20 सामना 10 नोव्हेंबर रोजी सामने रावळपिंडीच्या स्टेडियमवर खेळविले जातील.









