जाळपोळीचा मुख्य आरोपी मौलवी शरीफ अटकेत
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हिंदूंचे मंदिर पेटवून देणे आणि ते पाडविण्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मौलवी मोहम्मद शरीफ यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जमीयत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय-एफ) दोन स्थानिक मौलवी मोहम्मद शरीफ आणि फैजुल्लाह समवेत शेकडो अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.
हिंदू मंदिरावरील या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी बुधवारी रात्रभर अनेक ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतले होते. खैबर पख्तूनख्वामध्ये करक जिल्हय़ाच्या टेरी गावात मंदिरावरील हल्ल्यानंतर कट्टरवादी जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे नेते रहमत सलमान खट्टक समवेत 26 लोकांना अटक करण्यात आली आहे. जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या (फजल उर रहमान गट) समर्थकांच्या नेतृत्वाखालील जमावाने मंदिराच्या विस्तारीकरणाला विरोध दर्शविला आणि मंदिरासह नव्या निर्मितीकार्याला ध्वस्त केले आहे.
या घटनेची मानवाधिकार कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक हिंदू समुदायाने निंदा केली आहे. पाकिस्तानात मानवाधिकार विषयक संसदीय सचिव लालचंद मल्ही यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. काही लोक पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी अशाप्रकारच्या समाजविरोधी कृत्ये करत असून सरकार हा प्रकार सहन करणार नसल्याचे मल्ही यांनी सांगितले आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी मंदिरावरील हल्ल्याच्या दुर्देवी घटना ठरविले आहे. तसेच हल्ल्यात सामील लोकांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पूजास्थळांना अशाप्रकारच्या घटनांपासून रक्षण पुरविण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.
मंदिर परिसरात एका हिंदू धार्मिक नेत्याची समाधी असून हिंदू लोक तेथे दर गुरुवारी भेट देत असतात. या हल्ल्यामुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. इस्लामिक विचारसरणी परिषदेने याची दखल घ्यावी. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धार्मिक स्थळांवर पर्यटनाला चालना देणार असल्याचे म्हणतात, परंतु देशात अल्पसंख्याकांची पूजस्थळे सुरक्षित नाहीत असे उद्गार हिंदू समुदायाचे नेते हारुन दियाल यांनी काढले आहेत.









