वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आमच्या शेजारच्या देशाला आम्ही युद्धात तीनवेळा पराभूत केले आहे. आमच्या सैन्यदल या देशाला एक आठवडा ते दहा दिवसांमध्ये धूळ चारेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला मंगळवारी सज्जड इशारा दिला. केंद्रात यापूर्वी असणाऱया काँग्रेस सरकारने सैन्यदलाच्या सडेतोड कारवाईस नेहमीच विरोध केला. त्यामुळे सैन्यदलही ठोस कारवाई करू शकत नव्हते, असा दावाही त्यांनी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान गेली अनेक वर्ष भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. यामध्ये देशातील अनेक जवान हुतात्मा झाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तत्कालिन सरकारने शेजारच्या देशाविरोधात ठोस कारवाईस सैन्यदलास नेहमीच आडकाठी आणली. मात्र आज आम्ही सर्जिकल स्ट्राईक, हवाई हल्ले करू शकतो. हा नवा भारत दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून उत्तर देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकीय स्वार्थासाठी अनुच्छेद 370चा वापर
काही राजकीय कुटुंबांनी आपल्या स्वार्थासाठी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 जिवंत ठेवले होते. यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळाले. या समस्येने संपूर्ण देशाला अनेक दशकांपासून वेठीस धरले आहे. यावर मात करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘सीएए’ म्हणजे भारताने दिलेल्या आश्वासनाची पूर्तीच
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख आणि अन्य अल्पसंख्याकांना तुम्ही मायदेशात परत येऊ शकता, अशी ग्वाही भारताने दिली होती. ही महात्मा गांधी यांचीही इच्छा होती. याच भावनेतून 1950मध्ये नेहरू-लियाकत करार झाला होता. शेजारच्या देशांमध्ये वास्तव्यास असणाऱया अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ‘सीएए’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे; पण काही राजकीय पक्ष मतांसाठी याला विरोध करत आहेत. या प्रश्नाला धर्माचा रंग देण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आमचे सरकार सर्वधर्मीयांसाठी आहे. तीन तलाक पद्धत रद्द करणे असो की बोडोलँड शांती करार सर्वच पातळीवर केंद्र सरकारने सर्वांच्या हितासाठी धोरण राबविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.









