टीकेमुळे एका दिवसात बदलावा लागला निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा-महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यावरील बंदी घालण्याचा निर्णय एकाच दिवसात मागे घेण्यात आला आहे. संबंधित आदेश बुधवारी जारी करण्यात आला होता. या आदेशावर पाकिस्तानच्या सर्व भागांतून टीका झाली होती.
शिक्षण मंत्री राणा तनवीर हुसैन यांनी आयोगाला स्वत:चा वादग्रस्त आदेश मागे घेण्याचा निर्देश दिला असल्याची माहिती पंतप्रधानांचे निकटवर्तीय सलमान सूफी यांनी दिली होती. आयोग सर्व धर्मांचा आदर करतो आणि कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असे शिक्षण आयोगाकडून नवे वक्तव्य जारी करत सांगण्यात आले आहे.
आयोगावर उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी आहे, याचबरोबर पाकिस्तानची संस्कृती आणि परंपरा कायम राखणे देखील महत्त्वाचे आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो आणि त्याचे महत्त्व देखील मान्य करतो, परंतु धर्मावरून मिळालेले हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंतच योग्य असल्याचे शिक्षण आयोगाने यापूर्वी म्हटले होते.









