वृत्तसंस्था/ कराची
पाकच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱया क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मंगळवारी जाहीर केला. राष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या वेतनश्रेणी आराखडय़ामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याने आता सर्वोत्तम कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूला एक वर्षांच्या क्रिकेट हंगामासाठी 3.2 दशलक्ष रूपये (भारतीय चलनानुसार 14 लाख रूपये) मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्वसाधारणपणे एक वर्षांच्या क्रिकेट हंगामासाठी प्रत्येक क्रिकेटपटूला मासिक दीड लाख रूपये मिळणार आहेत.
30 सप्टेंबरपासून पाकमध्ये 2020-21 च्या क्रिकेट हंगामाला प्रारंभ होणार असल्याने पीसीबीने क्रिकेटपटूच्या वेतनश्रेणी आराखडय़ामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीशी मध्यवर्ती करार केलेल्या अ प्लस गटातील 10 क्रिकेटपटूंना प्रत्येकी मासिक दीड लाख रूपये वेतन दिले जाणार आहे. अ गटातील 38 क्रिकेटपटूंना प्रत्येकी मासिक 85 हजार रूपये, ब गटातील 48 क्रिकेटपटूंना प्रतयेकी मासिक 75 हजार रूपये, क गटातील 72 क्रिकेटपटूंना प्रत्येकी मासिक 65 हजार रूपये तर ड गटातील 24 क्रिकेटपटूंना प्रत्येकी मासिक 40 हजार रूपयांचे वेतन मिळणार आहे.









