बेळगाव / प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असणारा बेळगाव – दिल्ली विमान सेवेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. स्पाईस जेटने सुरू केलेल्या या विमान फेरीला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 284 प्रवाशांनी दिल्ली – बेळगाव – दिल्ली या मार्गावर प्रवास केला. या विमान फेरीमुळे बेळगावला बोईंग विमान उपलब्ध झाले आहे.
देशाची राजधानी असणाऱया दिल्ली शहराला बेळगावमधुन विमानफेरी सुरू व्हावी अशी मागणी अनेकवेळा होत होती. स्पाईस जेटने या मार्गावर बोईंग विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बेळगाव तसेच दिल्ली येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सोमवार व शुक्रवार असे आठवडय़ातून दोन दिवस ही विमान फेरी असणार आहे. या विमान फेरीमुळे बेळगावमधून थेट 13 शहरांना विमान सेवा उपलब्ध झाली आहे. अवघ्या दोन तास 25 मिनिटात दिल्ली गाठता येत असल्याने प्रवाशांचा पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.
एअर सॅल्यूटने बेळगावमध्ये स्वागत
दिल्ली येथून आलेल्या स्पाईस जेटच्या विमानाला एअर सॅल्युट देण्यात आला. या बोईंग विमानाची 149 आसन क्षमता आहे. पहिल्याच दिवशी 149 प्रवासी दिल्ली येथून बेळगावमध्ये दाखल झाले. तर 135 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले. पहिल्या दिवशी 95 टक्क्मयाहून अधिक प्रवासी क्षमता असल्याने विमानतळ प्राधिकरण तसेच विमान कंपनीकडून प्रवाशांचे आभार मानण्यात आले.
बेळगाव विमानतळावर या विमान फेरीचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला. खासदार मंगला अंगडी, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, केएलई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्गो सेवेचाही झाला शुभारंभ
बेळगाव विमानतळावरून कार्गे सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. शुक्रवार पासून या सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. बेळगावमधून आता 13 शहरांना कार्गे वाहतुक केली जाणार आहे. यामुळे विमानतळाच्या विकासामध्ये अधिक भर पडेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.









