बेळगावसह उपनगरांमध्ये सर्वत्र पसरला शुकशुकाट,अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने जुलै महिन्याच्या प्रत्येक रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात दुसऱया रविवारीही काटेकोर संचारबंदी पाळण्यात आली. संपूर्ण शहर व तालुक्मयात शुकशुकाट पसरला होता. मागील रविवारपेक्षा या रविवारी प्रशासनाने कडक संचारबंदी लागू केली. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होते.
बेळगाव शहर व परिसरात आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. ही वाढ चिंताजनक असल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रविवारी प्रशासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध अत्यंत कठोरपूर्वक राबविण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला बाहेर फिरण्यास परवानगी दिली जात नव्हती. अत्यावश्यक सेवा देणाऱया व्यक्ती सोडून इतर कोणीही रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू होती. शहराबरोबरच उपनगरांमध्ये संचारबंदीमुळे शुकशुकाट पहायला मिळाला.
स्वयंस्फूर्तीने पाळला लॉकडाऊन
एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाऊन व सध्याचा लॉकडाऊन यामध्ये मोठा फरक आहे. त्यावेळी पोलिसांच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नव्हते. विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांनाही काठीचा प्रसाद देण्याची वेळ येत होती. परंतु सध्या मात्र कोरोनाचा धोका प्रत्येकालाच समजल्याने स्वयंस्फूर्तीने नागरिक घरांमध्ये आहेत. यामुळे पोलिसांवरचा ताण काही प्रमाणात का होईना कमी झाल्याचे दिसून आले.
तरुणांनी दाखविली सामाजिक बांधिलकी
रविवारी सकाळपासूनच पावसाच्या हलक्मया सरी कोसळत होत्या. संचारबंदीमुळे हॉटेल व चहाच्या टपऱया बंद होत्या. या पावसातही पोलीस मात्र बंदोबस्तावर होते. त्यामुळे पोलिसांना चहा व बिस्किटे पोहोचविण्याचे काम महांतेशनगर येथील असद शेख या तरुणाने केले. घरी चहा बनवून त्यांनी तो गांधीनगर परिसरातील पोलिसांना वाटप केला. यामुळे पोलिसांकडून या तरुणाचे कौतुक होत होते.
अनेक ठिकाणचे रस्ते बंद
शहरात विनाकारण फिरणाऱयांना चाप बसावा याकरिता काही ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते. सदाशिवनगर, चन्नम्मा सर्कल, गोवावेस सर्कल येथे फिरून जावे लागत होते. शहराच्या प्रवेशद्वारांवर वाहनचालकांची कसून चौकशी होत होती. केएलई रोड, तिसरे रेल्वेगेट, गांधीनगर या ठिकाणी पोलिसांची करडी नजर होती.
उपनगरांमध्ये शुकशुकाट
बेळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्येही दुसऱया रविवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. अनगोळ, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, उद्यमबाग, टिळकवाडी, सदाशिवनगर, महांतेशनगर, शाहूनगर, विजयनगर, आझमनगर, वीरभद्रनगर, वैभव नगर या भागामध्ये रविवारी दिवसभर शुकशुकाट होता. सर्व व्यवहार बंद करून नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले.









