वृत्तसंस्था/ कोलकाता
भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दौऱयावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिनाभर चालणाऱया पक्षाच्या रथयात्रेचे उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. निवडणुकीत स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रथयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रा 5 टप्प्यांमध्ये होणार असून राज्यातील सर्व 294 विधानसभा मतदारसंघांना व्यापणार आहेत.
पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या रथयात्रेदरम्यान राज्यात पोहोचणार आहेत. या रथयात्रा शनिवार, सोमवार आणि मंगळवारी नवाद्वीप, कूचबिहार, काकद्वीप, झराग्राम आणि तारापीठ येथून रवाना होणार आहेत.
6 फेब्रुवारी रोजी या यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी नड्डा नवाद्वीपमध्ये असतील. रथयात्रा कार्यक्रमात अमित शाह हे देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली आहे.
एप्रिल-मेदरम्यान हाणाऱया निवडणुकीपूर्वी होणाऱया रथयात्रा पक्षासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी व्यक्त केला आहे. राज्यात 2018 मध्येही पक्षाने अशा रथयात्रांची योजना आखली होती, पण राज्य सरकारने अनुमती नाकारल्याने भाजपला अखेरच्या क्षणी हा कार्यक्रम स्थगित करावा लागला होता.









