प्रतिनिधी/ फोंडा
गोवा डेअरीने पशुखाद्याच्या दरात रू. 4 प्रति किलोने केलेल्या दरवाढीविरोधात दूधउत्पादकांसोबत प्रशासकांनी काल सोमवारी बैठक घेतली. चर्चेसाठी शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात शक्तीप्रदर्शन केल्याने सदर बैठक सहकार भवनाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रशासक अरविंद खुटकर यांनी शेतकऱयांसमोर दोन प्रस्ताव ठेवले. दुध उत्पादकांनी दोन्ही प्रस्ताव अमान्य केले, आपल्या मागणीवर ठाम राहिले व आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. काल दिवसभर डेअरी गेटसमोर ठाण मांडून होते. यावेळी आंदोलनकर्त्यानी आमसभेची मागणी केली असून पशुखाद्य दरवाढ कमी करण्य़ाची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे.
शुक्रवार 17 जाने. रोजी 30 दुध उत्पादकांनी दरवाढीच्या मुद्दावर गोवा डेअरीच्या प्रशासकांशी चर्चा करण्यासाठी गेटसमोर धरणे धरली होती.त्यानंतर उपजिल्हाधिकाऱयांनी हस्तक्षेप करून एमडी अनिल फडते यांच्या लेखी आश्वानुसार यावर तोडगा काढण्यासाठी सदर बैठक काल सोमवार 11 वा. बोलाविण्यात आली होती. पशुखाद्याच्या दरवाढीचे पाऊल दुध उत्पादकांना मारक असल्याच्या कारणाने शेतकऱयांच्या सुमारे 300 जणांच्या जमाव हजर राहिल्याने सदर चर्चा सहकार भवनात बोलाविण्यात आली. चर्चेअंती प्रशासक अरविंद खुटकर यांनी दिलेले दोन प्रस्ताव दुध उत्पादकांना मान्य नसल्याने डेअरीच्या गेटसमोर त्यांनी धरणे धरली. 16 जानेवारी 2020 रोजीपासून झालेली पशुखाद्य दरवाढ स्थगित ठेवा अशी जोरदार मागणी शेतकऱयांनी केली होती. गोवा डेअरीने शेतकऱयांच्या पशुखाद्यात केलेल्या वाढीनुसार शेतकऱयांकडून घेत असलेल्या दुधाला मोबदला म्हणून प्रति लिटर समांतर दरवाढीच्या हिशोबाने वाढवून द्यावा अशी मागणी दुध उत्पादकांनी यावेळी उचलून धरली.
गोवा डेअरीचा मारवासडा-उसगांव येथे असलेला पशुखाद्य प्रकल्प सुरळीत ‘ना-तोटाöना नफा’ या तत्वावर चालण्यासाठी डेअरीने केलेली रू. 4 प्रति किलो दरवाढ रास्त असल्याचे प्रशासक खुटकर यांनी सांगितले. जर पुर्वीच्या दराने पशुखाद्याची विक्री केल्यास डेअरीवर आर्थिक बोजा वाढणार आहे. दर महिन्याकाठी रू. 58 लाख नुकसानी सहन करावी लागेल. जर ही बाब शेतकऱयांनी मान्य असल्यास त्यांनी तसे लेखी निवेदन डेअरीला सुपुर्द करावे आपण ही दरवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असेही आवाहन केले.
दूध उत्पादक आपल्या मागणीवर ठाम
दरम्यान प्रशासकांनी सर्व शेतकऱयांची बाजू अत्यंत नम्रपणे ऐकून घेतली. 16 जाने. 2020 रोजी पशुखाद्यात केलेल्या वाढीला मंजूरी करण्यात आलेली आहे. दरवाढ कमी करण्यासंबंधी डेअरीने सरकारकडे अनुदानाची विनंती केलेली आहे. समजा ती अट मान्य झाल्यास डेअरीकडून पशुखाद्यासाठी शेतकऱयाकडून आकारण्यात आलेली वाढीव रक्कम त्यांच्या खात्यात परत केली जाईल. तर दुसऱया प्रस्तावात दुध उत्पादक सोसायटीच्या अध्यक्षांनी डेअरीला सदर दरवाढ मंजूर नसल्याचे लेखी निवेदन सादर करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही प्रस्ताव शेतकऱयांनी स्वीकारण्यात असंतोष दाखविला, दरवाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा दरवाढीच्या समान दरवाढ शेतकऱयाकडून घेत असलेल्य़ा दुधाला द्यावी या मागणीवर ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली. डेअरी गेटसमोर काल दिवसभर आंदोलनकर्ते ठाण मांडून होते.









