दूध उत्पादकांना फटका : खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड : अर्थकारणावर परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
मागील पंधरा-वीस दिवसांत पशुखाद्यांच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन आणि एकूण खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः पशुखाद्यांमध्ये भुसा, शेंगापेंड, सरकीपेंड, तूरचुनी, मकाभरडा आणि कुळीथच्या दरात वाढ झाली आहे.
अलीकडे शेतीबरोबर पशुपालन करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गाय, म्हैस, बैल याबरोबर शेळय़ा-मेंढय़ांची संख्यादेखील वाढली आहे. जनावरांना पौष्टिक आहार म्हणून भुसा, तूरचुनी, सरकीपेंड दिली जाते. दुभत्या जनावरांना दूध क्षमता वाढविण्यासाठी पशुखाद्य आवश्यक असते. मात्र पशुखाद्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने दुधाच्या दरात खर्चही भागत नसल्याच्या तक्रारी उत्पादकांतून व्यक्त होत आहेत. पशुखाद्याचे दर क्विंटलमागे 200 ते 400 रुपयांनी वाढल्याने पशुखाद्ये चढय़ा दराने खरेदी करावी लागत आहेत.
पोषक आहार म्हणून वापरली जाणारी सरकीपेंड, मका आणि तूरचुनीचा दर देखील वाढला आहे. त्यामुळे पशुखाद्य कसे खरेदी करावे? या विवंचनेत उत्पादक सापडले आहेत. पशुखाद्य म्हणून गहू, भुसा, कोंडा, तांदूळ, कणी, मका याचा वापर केला जातो. मात्र गव्हाबरोबर कोंडय़ाचा दरदेखील वाढल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 900 रुपये असलेल्या भुश्याचा दर 1250 रुपये झाला आहे. पशुपालकांना दूध डेअरीतून दुधाची प्रतवारी ठरवून फॅटनुसार दर दिला जातो. मात्र पशुखाद्याचे दर वाढल्याने ताळमेळ बसणे अवघड झाले
आहे.
पशुखाद्याचे दर
| पशुखाद्य | वजन | किमती (दर) |
| भुसा | 50 किलो | 1000 ते 1250 रु. |
| कांडीपेंड | 50 किलो | 700 ते 1200 रु. |
| सरकीपेंड | 45 किलो | 1400 ते 1800 रु. |
| मकाभरडा | 50 किलो | 1200 ते 1300 रु. |
| तूरचुनी | 50 किलो | 1050 रु. |
| हरभराचुनी | 50 किलो | 1200 रु. |
| कुळीथ भरडा | 100 किलो | 4000 रु. |
| शेंगापेंड | 50 किलो | 2550 रु. |









