सर्वसामान्य प्रवाशांचे हाल – अकरा दिवस उलटले परिस्थिती जैसे थेच
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अकरा दिवसांपासून परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप मागे घेतला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असले तरी परिवहन मंडळाने आपल्या बाजूंनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याला काही प्रमाणात यश येत आहे. परिवहनने प्रशिक्षणार्थी व काही चालक व ज्ये÷ वाहन चालकांना हाताशी धरून काही मोजक्मया बस विविध मार्गांवर सुरू ठेवल्या आहेत. दररोज 30-35 बस धावत असल्या तरी लांब पल्ल्यांसाठी अद्याप बससेवा सुरू झाली नाही. काही प्रमाणात विविध मार्गांवर 70 कर्मचाऱयांच्या आधारे बससेवा सुरू ठेवली आहे.
परिवहनच्या कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील अकरा दिवसांपासून सुरू असलेला संप शनिवारीदेखील सुरूच होता. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. कामगार व नोकरदार वर्गातून या संपाविषयी नाराजी व्यक्त होत असून परिवहनच्या संपाचा तिढा कधी सुटणार या विवंचनेत प्रवासी आहेत. दरम्यान, कर्मचाऱयांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपले आंदोलन विविध मार्गाने सुरू ठेवले आहे. मात्र, प्रशासनानेही यापूर्वी सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीला नकार दर्शविला आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. परिवहन व सरकारही आपल्यापरीने संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या परिवहनच्या संपाचा तिढा कधी मिटणार? असा प्रश्न सामान्य प्रवासीवर्गांना पडला आहे.
परिवहनचे कर्मचारी सहाव्या वेतनाच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील अकरा दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. बेळगाव विभागातून काही बस धावत असल्या तरी विभागाला दररोज 60 लाखांचा फटका बसत आहे. बेळगाव विभागातील चार आगारांसह सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर या सात आगारांचा बेळगाव विभागात समावेश आहे. मात्र, या सगळय़ाच आगारांना संपाचा मोठा फटका बसला आहे.
शनिवारी पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बेळगाव विभागातून अंदाजे साडेतीनशे बसची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी निवडणुकीसाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. निवडणुकीसाठी बेळगाव आगारासह चिकोडी व विजापूर आगारांतून बस मागविण्यात आल्या. मात्र, बसची संख्या कमी असल्याने खासगी वाहनांचीदेखील मदत घेण्यात आली.









