बंदचा फटका, प्रवासी अडकले, पोलिसांचा बंदोबस्त
बेळगाव / प्रतिनिधी
विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी कर्नाटक बंदची हाक दिली होती. त्यामुळे बससेवा सुरू राहणार की बंद या संभ्रमात प्रवासी होते. दरम्यान, सोमवारी बससेवा सुरू राहील अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात बससेवा ठप्प झाली. सकाळच्या सत्रात काही मोजक्मयाच बस धावल्या. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून बसस्थानकातून एकही बस बाहेर सोडली नाही. त्यामुळे काही प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले. त्याबरोबरच विविध आगारांतून आलेल्या बसेस बेळगाव बसस्थानकात अडकून पडल्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
बसस्थानकात विजापूर, शिरसी, रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक, निपाणी, रायबाग, चिकोडी आदी आगारातील बसेस बेळगाव बसस्थानकात अडकून पडल्या होत्या. याबरोबरच स्थानिक लांब पल्ल्याच्या बसेसही आगारातून बाहेर गेल्या नाहीत. आधीच कोरोनामुळे परिवहन मंडळाला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. या काळात बेळगाव विभागाला तब्बल 110 कोटींचा फटका बसला आहे. त्यातच सोमवारी विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदचा फटका बेळगाव विभागाला बसला आहे. स्थानिक बसेससह लांब पल्ल्याचा बसेस जाग्यावरच थांबून राहिल्याने मोठा फटका बसला. कोरोनातून नुकताच परिवहन मंडळाच्या चाकांना हळूहळू गती मिळत असतानाच सोमवारी बंदमुळे त्यात भरच पडली.









