ऑनलाईन टीम / मुंबई :
खंडणीच्या प्रकरणात गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अन्य 25 पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याकडे दिला आहे. गृहखात्याने या प्रस्तावावर सावध भूमिका घेत संबंधित सर्व अधिकाऱयांची माहिती मागितली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
परमबीर सिंग यांच्यावर खंडणी प्रकरणात 5 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात परमबीर यांच्यासह डीजी, एसपी रँकच्या अधिकाऱयांची नावे गोवली गेली आहेत. अशा 25 अधिकाऱयांच्या निलंबनाचा प्रस्ताव पांडे यांनी गृहखात्याकडे पाठवला आहे. मात्र, गृहखात्याने हे प्रकरण सबुरीने घेतले आहे. निलंबनाच्या यादीतील 25 जणांना एकाच तराजूत तोलता येणार नाही. एखादा अधिकारी एखाद्या प्रकरणात मुख्य आरोपी असू शकतो. तर काही जण नाममात्र असू शकतात. त्यामुळे गृहखात्याने पांडे यांच्याकडून संबंधित अधिकाऱयांचा सविस्तर तपशील मागितला आहे.









