आटपाडी / प्रतिनिधी
जिल्हा बंदी असतानाही विनापरवाना परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आटपाडी तालुक्यात आलेल्या 11 लोकांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. आटपाडी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. तर जनता कर्फ्यू मध्ये मटन विक्री केल्याप्रकरणी आटपाडीतील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील आण्णा काळे, शालन काळे, सुरेश काळे, राणी काळे, हृदयकुमार सावंत, रोहिणी सावंत, पल्लवी सरतापे, लिंगीवरे येथील मारुती पवार, संजय भोकरे, रंजना भोकरे, घरनिकी येथील संतोष पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आटपाडी शहरात गुरुवारी जनता कर्फ्यु असतांनाही मटण विक्री केल्या प्रकरणी हर्षद खाटीक याच्यावर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोरोना प्रश्नी पोलीस प्रबोधन करत आहेत. कारवाई होत आहे. तरीही लोक विनाकारण फिरत आहेत. आता बाहेर फिरणाऱ्या वर ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठवली जात असून लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी केले आहे.








