वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत भारताचे नेमबाज दिव्यांश सिंग पनवर आणि अर्जुन बबुटा यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीच्या पात्र फेरीमध्ये 18 वषीय नेमबाज पनवरने एकूण 629.1 गुण घेत सहावे स्थान मिळवित अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे 2016 साली आयएसएसएफच्या विश्वचषक कनि÷ांच्या नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया अर्जुन बबुटाने या क्रीडा प्रकारात शुक्रवारी 631.8 गुण नोंदवित तिसरे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताचा दीपक कुमार अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्याने पात्रता फेरीत 626.4 गुणांसह बारावे स्थान मिळविले. पात्र फेरीमध्ये दक्षिण कोरियाचा नेमबाज 632.1 गुणांसह पहिल्या स्थानावर असून इस्रायलचा रिश्टर 631.8 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. 2019 च्या एप्रिलमध्ये बीजिंग येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या पनवरने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत रौप्यपदक मिळवून टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले होते. सदर स्पर्धा दिल्लीच्या डॉ. कर्णिसिंग नेमबाजी संकुलात सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत 53 देशांचे 294 नेमबाज सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत यजमान भारताच्या 57 नेमबाजांनी भाग घेतला आहे.









