उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण : परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठे, डिप्लोमा कॉलेजना अल्टिमेटम
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील पदवी आणि डिप्लोमाच्या उरलेल्या सेमिस्टर परीक्षा नियोजित वेळेत संपवाव्यात, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी राज्यातील विद्यापीठे आणि पॉलिटेक्निक कॉलेजना दिली. त्याचप्रमाणे पदवी महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
परीक्षा घेण्याबाबत आणि कॉलेज सुरू करण्यासंबंधी बेंगळूरमध्ये वरिष्ठ अधिकारी व उच्च शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. उच्च शिक्षण विभागातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर पुढील दोन दिवसांत ठोस निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत राज्यातील 65 टक्के पदवी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच लस देण्यात येईल. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये लसीकरण अभियान जलदगतीने राबविले जात आहे, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
ऑफलाईन वर्गांसाठी हजेरीची सक्ती नाही
विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गांना हजर राहणे सक्तीचे नाही. इच्छुक विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये वर्गांना हजर होऊ शकतील. मात्र, त्यांना ऑनलाईन किंवा ऑनलाईन यापैकी एका वर्गासाठी हजेरी सक्तीची असणार आहे. मे महिन्यापासूनच ऑनलाईन वर्ग यशस्वीपणे सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
परीक्षेसंबंधी विद्यापीठांना सूचना
डिप्लोमाच्या पहिल्या, तिसऱया आणि पाचव्या सेमिस्टरची प्रायोगिक परीक्षा 26 ते 28 जुलै या कालावधीत आणि याच सेमिस्टरमधील उर्वरित विषयांची थिअरी परीक्षा 2 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत घ्याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. तर दुसऱया, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरची प्रायोगिक परीक्षा 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत घ्याव्यात. शिवाय याच सेमिस्टरमधील थिअरी परीक्षा 17 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान घेण्यात येतील. सर्व परीक्षा कोविड मार्गसूचीनुसार घेतल्या जाणार आहेत.
काही विद्यापीठांच्या परीक्षा पूर्ण
राज्यातील अनेक विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत. कोरोना परिस्थितीमुळे कर्नाटक विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ, बेंगळूर विद्यापीठाच्या परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्या परीक्षा ऑक्टोबरपूर्वी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
उद्या घोषणा?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पदवी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये केव्हापासून सुरू करावीत, याबाबतचा निर्णय रविवारी किंवा सोमवारी घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते. 25 जुलै किंवा 1 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात येण्याची दाट शक्यता आहे.









