ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून प्रवेश प्रक्रिया सुरू : उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
ऑक्टोबर महिन्यापासून पदवी शिक्षणाचे 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच बीएससीच्या पहिल्या वर्षातील प्रवेशासाठी सीईटी न घेता थेट प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
डॉ. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी 2021-22 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक उपक्रमांविषयी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची व्हर्च्युअल पद्धतीने बैठक घेऊन चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पदवीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याची सूचना कुलगुरुंना देण्यात आली आहे. काही ठिकाणी परीक्षा झाल्या आहेत तर काही ठिकाणी नाही. याविषयीही बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. पुढील वर्षी कोणत्या स्वरुपात परीक्षा असावी, गुणात्मक शिक्षण देण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी देखील माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
आगामी दिवसांत विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी समन्वय राखून एकीकृत व्यवस्थापन व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता स्वतंत्र पोर्टल तयार होत असून त्याची ई-गव्हर्नन्स विभागाकडून निर्मिती होत आहे. 25 जूनपासून त्याचा प्रागोगिकपणे वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 15 जुलै रोजी त्याचे लोकार्पण करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या मुदतीआधीच सर्व सरकारी शिक्षण संस्थांमध्ये हे पोर्टल वापरण्यास सज्ज असावे, अशी सूचनाही डॉ. अश्वथ नारायण यांनी कुलगुरुंना दिली.
व्हर्च्युअल पद्धतीने अध्यापन करा!
कोरोना परिस्थिती आणखी किती दिवस असेल हे ठाऊक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय असणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक सुविधा शिक्षण संस्थांमध्ये असाव्यात. डिजिटल माध्यमापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन व्हर्च्युअल पद्धतीने अध्यापन करण्याची सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा बारावी परीक्षा रद्द झाल्याने बीएससी प्रथम वर्षासाठी देखील सीईटी रँकींगच्या आधारे प्रवेश देण्याचा विचार उच्च शिक्षण खात्याने चालविला होता. मात्र, आता तो बाजूला सारण्यात आला आहे.
पदवीसाठी यंदापासूनच नवे शिक्षण धोरण
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारसीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा सल्ला डॉ. अश्वथ नारायण यांनी विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंना दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा बारावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विविध कोर्सना अधिक मागणी आहे. विद्यापीठांना ही सुवर्णसंधी आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठांनी कौशल्य विकासासाठी इच्छुक असणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. यंदापासूनच नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आमलात आणले जात आहे. त्यासाठी योग्य कार्यसूची तयार करण्यासाठी विषयनिहाय समिती नेमण्याची सूचनाही डॉ. अश्वथ नारायण यांनी कुलगुरुंना दिली. 15 जुलैपूर्वी या समित्यांनी अहवाल सादल करावा, असेही ते म्हणाले.









