कॅन्टोन्मेंट बंगलेधारक संघटनेचे मौन
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने विद्युत बिलाची रक्कम भरली नसल्याच्या कारणास्तव पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी कॅन्टोन्मेंट हद्दीत सगळीकडे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, याबाबत प्रशासनासह कॅन्टोन्मेंटच्या माजी सदस्यांनी देखील कानाडोळा केला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासीयांना कोणी वाली नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाकाळात शहरातील वाहतूक कॅम्प परिसरातील विविध मार्गाद्वारे वळविण्यात आली होती. त्यामुळे कॅम्प परिसरातील निम्म्याहून अधिक रस्ते खराब झाले आहेत. तसेच ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारक आणि रहिवाशांचे हाल होत आहेत. अशातच या भागातील पथदीप बंद असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने हेस्कॉमचे बिल भरले नाही. थकीत बिलाची रक्कम अदा करण्याची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डला हेस्कॉमने केली होती. मात्र सूचना करूनही बिलाची रक्कम अदा केली नसल्याच्या कारणास्तव पथदीपांचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत देखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच नागरिकांनी देखील याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या. पण निधी नसल्याचे कारण सांगत याकडे दुर्लक्ष झाले आहे. किल्ला आणि कॅन्टोन्मेंट परिसरात झाडे-झुडपे असल्याने रात्रीच्यावेळी अंधार पसरलेला असतो. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना आणि रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यांची दुरूस्तीकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष रस्त्यांची दुरूस्ती करण्याकडे कॅन्टोन्मेंटने दुर्लक्ष केले आहे. पथदीप सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन, खासदार, आमदारांना आणि हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांना संपर्क साधून पथदीप सुरू करण्यासाठी तोडगा काढावा अशी विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डने केली होती. पण याबाबत अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील याकडे कानाडोळा केला आहे. स्थानिक रहिवाशांना बेडसावणाऱया समस्यांबाबत लोकनियुक्त सदस्यांकडून कॅन्टोन्मेंट बैठकीत तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र सध्या लोकनियुक्त सदस्य नसल्याने कॅन्टोन्मेंटवासियांच्या समस्या कोण सोडविणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. विविध सामाजिक कार्यात सहभागी असणाऱया कॅन्टोन्मेंटच्या माजी सदस्यांनी देखील पथदीपांच्या समस्येबाबत मौन धारण केले आहे. माजी सदस्यांनी व बंगलेधारक संघटनेने याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.









