प्रतिनिधी / पणजी

द गोवा विंटेज ऍण्ड क्लासिक व्हेईकल्स क्लबतर्फे आज पणजीत ‘पॅलेस टू पॅलेस विटेंज ऍण्ड क्लासिक कार ड्रायव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली पणजीतील आदिलशहा पॅलेस येथून सुरू करण्यात आली आणि पेडणे येथील देशप्रभू रॉयल पॅलेस येथे सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे 50 क्लासिक विंटेज कार या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. सदर कारचा पहिला थांबा अटल सेतूवर झाला त्यानंतर पेडणे येथील देशप्रभू यांच्या राजवाडय़ात राजेशाही थाटात विंटेज कारचे स्वागत करण्यात आले. गोवा व गोव्याबाहेरील विंटेज कार या रॅलीमध्ये समाविष्ट झाल्या होत्या. सुंदर आणि मोहक अशा या गाडय़ा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. सदर कार्यक्रम स्व. जितेंद्र देशप्रभू यांना समर्पित करण्यात आला होता. सदर रॅलीमध्ये दुर्मिळ अशा कारचा अनुभव काररसिकांना तसेच प्रेक्षकांना घ्यायला मिळाला.









