विक्रेते, दुकानदारांची थर्मल चाचणी होणार
प्रतिनिधी / पणजी
पणजी मार्केट आज सोमवार 15 जूनपासून पूर्णवेळ खुले करण्यात येणार असून ग्राहकांना प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजाच उघडा ठेवला जाणार आहे. मार्केटची उर्वरित सर्व दारे बंद रहाणार असून विक्रेते, दुकानदारांची थर्मल गनने तपासणी होणार आहे. चिंबलमधील व्यापारी, दुकानदार, विकेत्यांना मात्र कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश मिळणार आहे.
महापौर उदय मडकईकर यांनी वरील माहिती देऊन सांगितले की कोरोनाचा प्रसार पणजी मार्केटातून होऊ नये म्हणून ते काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि भाजीपाला, फळविक्रेत्यांनी त्यांच्या मालाची नासाडी होऊ नये म्हणून मार्केट खुले करण्याची मागणी केल्याने गेले दोन दिवस फक्त सकाळच्या सत्रात सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत मार्केट खुले करण्यात आले व संध्याकाळी बंद ठेवण्यात आले.
पणजी मार्केट असोसिएशनने मार्केटात कोणीही कोरोनाबाधित नसल्याचे सांगून ते पुर्ववत खुले करण्यात यावे अशी मागणी केली. त्यास अनुसरून आता सोमवारपासून मार्केट सर्व विक्रते, व्यापारी, दुकानदार यांच्यासाठी खुले होणार आहे. अशी माहिती मडकईकर यांनी दिली. चिंबलमधील पणजीत मार्केटात धंदा करणारे अनेक व्यापारी विक्रेते दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घेतली असून त्यांचे बहुतेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे मडकईकर यांनी नमुद केले.









