एकंदरीत निकालाचा आढावा; झालेल्या चुकांवर चर्चा
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काँगेस उमेदवारांची पणजीत काँगेस भवनात बैठक होऊन त्यात एकंदरीत निकालाचा आढावा घेण्यात आला. तसेच कोणत्या चुका झाल्या यावर चर्चा करण्यात आली. अनेकांनी पक्ष विरोधी कारवाया झाल्याची, केल्याची तक्रार मांडली व त्याबाबतचा अहवाल उमेदवारांनी द्यावा असे त्यांना सांगण्यात आले.
काँगेस गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सदर बैठक बोलावली होती. परंतु काही कारणाने ते बैठकीस हजर राहू शकले नाहीत म्हणून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवून पक्षाच्या निवडणुकीतील एकंदरीत कामकाजाचा आढावा सादर केला. पक्ष विरोधी अधीकृत उमेदवारांविरोधात काम केल्याची तक्रार अनेक उमेदवारांनी केली व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सुचवले. त्याचा अहवाल काँगेसच्या केंदीय नेत्यांना पाठवण्यात येणार असून ते याप्रकरणी निर्णय घेतील, अशी माहिती कामत यांनी दिली. त्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अहवाल द्यावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेता कोण होणार ? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँगेसचे केंदीय नेते त्यानुसार प्रक्रिया करून काय तो निर्णय घेतील, असे कामत यांनी स्पष्ट केले.








