देशाची अन्नाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढते औद्योगिकीकरण यामुळे शेतजमिनीचे प्रमाण घटत चालले आहे. म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाने पडीक भूमी लागवडीखाली आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना क्रियान्वित केली आहे. या संस्थेच्या प्रयोगशाळेने ‘हालो मिक्स’ नामक नवीन सूत्र तयार केले असून त्याचा उपयोग पडीक भूमी सुपीक बनविण्यासाठी होतो. आतापर्यंतच्या प्रयोगातून असे दिसून आले आहे की या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होऊ शकते.

क्षारपड भूमी लागवडीखाली आणण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. लखनौ, रायबरेली, उन्नाव इत्यादी जिल्हय़ातील शेतकऱयांच्या 1400 एकर पडीक जागेत हे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे दोन-तीन वर्षातच क्षारपड जमिनीचे प्रमाण कमी होऊन तीची सुपीकता वाढल्याचे दिसून आले. उत्पादनात 11 ते 14 टक्के वाढ झाली. भारतात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक खतांच्या उत्पादनामुळे क्षारपड जमिनी तयार होत आहेत. त्यांना पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी हे तंत्रज्ञान विशेषतत्त्वाने उपयोगी पडणार आहे.









