बाइकस्वाराने फेकला ग्रेनेड – जीवितहानी नाही – पोलिसांना सापडली बेवारस कार
वृत्तसंस्था / पठाणकोट
पंजाबच्या पठाणकोट जिल्हय़ातील सैन्य तळावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला आहे. हा ग्रेनेड तळाच्या त्रिवेणी प्रवेशद्वारावर फेकण्यात आला. या हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झालेली नसली तरीही पठाणकोटमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. पोलिसांकडून कानाकोपऱयात झडती घेण्यात येत आहे. याचदरम्यान पोलिसांना एक बेवारस कार सापडली असून त्याच्या नंबरप्लेट बदलण्यात आल्या होत्या. स्फोट घडविण्याकरता या कारचा वापर झाला असण्याची शक्यता विचारात घेत पोलीस तपास करत आहेत.
या घटनेनंतर पूर्ण पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अमृतसर, जालंधर, भटिंडा, गुरदासपूर आणि अन्य सर्व शहरांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली. नाक्यांवर पोलीस अधिकाऱयांना तैनात करण्यात आले. सैन्यतळाच्या प्रवेशद्वारामधून एक वरात निघत असताना दुचाकीस्वार युवक तेथून गेला होता. याच युवकाने ग्रेनेड फेकल्याचा संशय आहे. पठाणकोटचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी याप्रकरणी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात असल्याचे सांगितले. स्फोटानंतर ग्रेनेडचा हिस्सा हस्तगत करण्यात आला.
सैनिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार रात्री तळासमोरून एक दुचाकी गेली होती. दुचाकीवरील युवकांनी प्रवेशद्वाराच्या दिशेने ग्रेनेड फेकला होता. स्फोटानंतर हा परिसर सील करत शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचे लांबा यांनी सांगितले.
सैन्याचा सर्वात महत्त्वाचा तळ
पंजाबचा पठाणकोट जिल्हा भारतीय सैन्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण तळांपैकी एक आहे. तेथे भारतीय वायुदलाचा तळ, सैन्याचा दारुगोळा भांडार आणि दोन चिलखती ब्रिगेड आहेत.
5 वर्षांपूर्वी वायुतळावर हल्ला
पठाणकोटमध्ये वायुदलाच्या तळावर 2 जानेवारी 2016 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय सैन्याच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 जण हुतात्मा झाले होते. सर्व दहशतवादी भारत-पाकिस्तान सीमेवर रावी नदीच्या मार्गे दाखल झाले होते. भारतात शिरल्यावर दहशतवाद्यांनी काही वाहनांना हायजॅक करत पठाणकोट वायुतळात शिरकाव केला होता.
फिरोजपूरमध्ये मिळाला बॉम्ब
दोन दिवसांपूर्वी फिरोजपूर जिल्हय़ातील सेखा गावातून टिफिनबॉम्ब मिळाला होता. वृक्षारोपण करताना हा बॉम्ब सापडला होता. यापूर्वीही पंजाबमध्ये 6 हून अधिक टिफिन बॉम्ब आणि हँडग्रेनेड मिळाले आहेत. तर फाजिल्का जिल्हय़ातील जलालाबादमध्ये एक स्फोटही झाला आहे. 15 सप्टेंबर रोजी दोन युवकांनी दुचाकीवर बॉम्ब पेरून तो भाजीमार्केटमध्ये ठेवण्याचा कट रचला होता. पण या बॉम्बचा अर्ध्या वाटेतच स्फोट झाला आणि एका युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक करत शस्त्रास्त्रs हस्तगत केली आहेत.









