जिल्हय़ात अनास्था, ना कुठले कार्यक्रम, ना जनजागृती
प्रतिनिधी/ चिपळूण
पद्मभूषण डॉ. सलीम अली यांची जयंती आणि साहित्यिक, सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शासनाने 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात पक्षी सप्ताह साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार कार्यक्रमही दिले. मात्र सप्ताह साजरा करण्याचे परिपत्रक जसे आले तसे उडून गेले. जिल्हय़ात पक्षी सप्ताहात फारसे कार्यक्रम झालेच नाहीत. ज्यांनी साजरा करायचा होता त्या वनविभागाच्या बऱयाच अधिकाऱयांना या सप्ताहाची माहितीच नसल्याचे पुढे आली आहे.
नोव्हेंबर महिना पक्षी स्थलांतरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतानाच मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिनही 5 नोव्हेंबर असून सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबर रोजी असते. त्यामुळे जन्मदिन आणि जयंतीचे औचित्य साधत 5 ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह साजरा करण्यात यावा, अशी मागणी पक्षीप्रेमी संस्था व राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांकडून होत होती. या मागणीचा विचार करत राज्य सरकारने हा निर्णय घेतला. या पक्षी सप्ताहामध्ये पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, स्थलांतर, अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठी पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शनी, कार्यशाळा, माहितीपटाचे आयोजन तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, पाणथळी, तलाव, धरण, जंगल येथे कार्यक्रम, पक्षी गणना, अभ्यास, अधिवास स्वच्छता करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. जलसंपदा, कृषी, पोलीस विभाग या शासकीय यंत्रणांना यात सहभागी करून घ्यावे, असेही वनविभागाला कळवण्यात आले होते.
दरम्यान, जिल्हय़ात या पक्षी सप्ताहाबाबत मात्र फारच अनास्था दिसून आली. हाताच्या बोटावर मोजणाऱया संस्था सोडल्या तर कुणी हा पक्षी सप्ताह फारसा मनावर घेतलेला दिसून आलेला नाही. त्यातच कोरोना महामारीच्या भीतीमुळे कार्यक्रम घेता येत नसल्यानेही हे ही एक कारण ठरले. असे असले तरी अनेकांपर्यत या सप्ताहाबाबतची माहितीच पोहोचलेली नाही. वनविभागाने प्रत्येक विभागात पक्षी सप्ताहासंदर्भात कार्यक्रम घेण्यास आपल्या अधिकाऱयाना सांगितले होते. मात्र तसे कार्यक्रम घेतल्याचे कुठेही दिसून येत नाहीत. सप्ताहाच्या प्रसिध्दीतही कमतरता जाणवल्याचे पुढे येत आहे.









