वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याला 2023 च्या संपूर्ण क्रिकेट हंगामाला मुकावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
30 डिसेंबर रोजी पंतच्या मोटारीला दिल्लीत अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्याला जबरदस्त दुखापत झाली. कारने पेट घेतल्याने त्याच्या चेहऱयाला त्याचप्रमाणे पाठीला दुखापती झाल्या असून पायालाही गंभीर इजा झाली. त्याच्या पायावर आतापर्यंत दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर तिसरी शस्त्रक्रिया तब्बल दीड महिन्यानंतर केली जाणार आहे. मात्र, पंतची तब्येत मात्र काळजी करण्यासारखी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 2023 च्या संपूर्ण क्रिकेट हंगामात तो मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता दुरावली आहे. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱयावर येणार असून उभय संघात होणाऱया कसोटी मालिकेला पंतला मुकावे लागत आहे. निवड समितीने आता या मालिकेसाठी पंतच्या जागी के. एस. भरत आणि इशान किसन यांची संघात निवड केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत के. एस. भरत आणि ईशान किसन यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकण्यात येईल.









