व्हर्चुअल कार्यक्रमातून केला 29 बालकांचा सन्मान
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण देशभरातील 61 बालकांना केले आहे. हा कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने सोमवारी पार पडला. पुरस्कार विजेत्या बालकांना डिजिटल प्रमाणपत्र आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून पुरस्काराची रक्कम देण्यात आली, अशी माहिती देण्यात आली.
या पुरस्कारविजेत्यांपैकी 32 बालकांना गेल्यावर्षी पुरस्कार घोषित करण्यात आले होते. तर 29 बालकांची निवड यावर्षीच्या पुरस्कारांसाठी झाली होती. गेल्या वर्षी पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे सोमवारी सर्व 61 बालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि याच विभागाचे राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांमुळे आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. पुरस्कारांचा दबाव आपल्यावर येता कामा नये. आपण स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी पुढे आलात. आता व्होकल फॉर लोकल अभियानासाठीही आपण पुढाकार घ्यावा. आपण आपल्या प्रतिदिन जीवनात कोणत्या वस्तू उपयोगात आणतो ? त्यांपैकी किती वस्तू भारतात बनतात आणि किती विदेशातून आणाव्या लागतात, याची एक सूची आपण तयार करावी. भारतात बनलेल्या वस्तूंचीच खरेदी आपण जास्तीत जास्त प्रमाणात करावी. ज्या वस्तूंना भारतीय मातीचा सुगंध आहे, त्या वस्तू उपयोगात आणीन असा निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे, असा महत्वाचा संदेश त्यांनी दिला.
पुरस्कार विजेत्यांशी गप्पा
मध्यप्रदेशचे बाल लेखक अणि कवी अवि शर्मा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. इतक्या लहान वयात आपण कविता करता, व्याख्याने देता, आपण बालमुखी रामायण लिहिले आहे. हे सर्व आपण कसे करु शकता असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर अवि शर्मा यांनी ‘ही सर्व रामाचीच कृपा आहे. लॉकडाऊनच्या काळात टीव्हीवर रामायण मालिका दाखविण्यात आली. त्यावरुन बालमुखी रामायणाची कल्पना सुचली, असे उत्तर अवि शर्मा यांनी दिले.
फुटलेल्या काचांवर शास्त्रीय नृत्य करणारी कर्नाटकाची बालिका रेमोना हिनेही आपले अनुभव कथन केले. हे करण्यासाठी आईचे प्रोत्साहन मिळाले. मला वडील नाहीत. आईने अतिशय कष्टाने पैसे जमवून मला नृत्याची शिकवणी लावली. मला माझी आई आणि माझे गुरु यांचे नाव अजरामर करायचे आहे. शिवाय भावाचे शिक्षणही पूर्ण करायचे आहे, असे उत्तर रेमोना हिने दिले.
तारुशी गौर या बालिकेचा आदर्श मेरीकॉम आहे. मेरीकॉमधील कोणती बाब तुला अधिक आवडते, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला. यावर, अशा बऱयाच बाबी आहेत. मेरीकॉम एक धावपटू आहे. एक आई आहे आणि संकटाच्या काळात ती धीर न सोडता ध्येयाशी घट्ट चिकटून राहते, असे उत्तर तिने दिले.









