धारापुरम / वृत्तसंस्था
द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस युतीकडे कोणतेही नवे आणि जनताभिमुख कार्यक्रम नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी ते तामिळनाडूच्या एक दिवसाच्या दौऱयावर आले होते. त्यांनी शेजारच्या केरळ राज्यातही दोन प्रचारसभा घेतल्या. केरळमध्ये त्यांनी डाव्यांवर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. केरळमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
द्रमुकचे नेते महिलांसंबंधी असभ्य भाषेत टीका करतात. काही दिवसांपूर्वी या पक्षाचे नेते आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील आरोपी ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या मातेविषयी अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली होती. असे लोक सत्तेवर आले तर ते अशा असंख्य महिलांचा अपमान अशाच प्रकारे करतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये तामिळनाडूत अद्रमुकच्या नेतृत्वात मोठी प्रगती झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील जनतेला याची जाणीव असून ती विकासविरोधी द्रमुकला सत्तेवर आणणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. मंगळवारी त्यांनी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना निर्धाराने प्रयत्न करण्याचे आवाहन केले, तसेच रालोआचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
केरळ सरकार भ्रष्टाचारी
शेजारच्या केरळ राज्यातील पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत राज्य सरकारवर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. काही महिन्यांपूर्वी राज्यात सोन्याच्या तस्करीचे प्रकरण उघड झाले होते. राज्य सरकारमधील काही अधिकारीही यात सामिल असल्याचा आरोप असून या प्रकरणी कारवाई सुरू आहे. याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. भाजपला विजयी केल्यास भ्रष्टाचाराचा निःपात करण्याचे आश्वासन देतानाच राज्यासाठी अनेक प्रगतीपर योजनाही त्यांनी घोषित केल्या.
बॉक्स
झीजस आणि जुडास सोन्याच्या काही तुकडय़ांसाठी केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने येथील सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा विश्वासघात जुडास याने केला होता, तसाच हा प्रकार आहे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. केरळमध्ये ख्रिस्ती मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी हा ऐतिहासिक प्रसंग सांगितला









