‘लॉकडाऊन’च्या कालावधीवर निर्णयाची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (टाळेबंदी) कालावधीबाबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर
चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱया संवादातून लॉकडाऊनवर
निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा
फैलाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सलग 21 दिवस लॉकडाऊन
जाहीर केले होते. आता शनिवारी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येणार का, या प्रश्नावर
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी
लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी वैद्यकीय
तज्ञांसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र
मोदींकडे केली आहे. ओडिशाने 30 एप्रिलपर्यंत तर पंजाबने 1 मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन हे टप्प्याटप्प्याने उठविण्यात येईल, असे विरोधी पक्षांबरोबर
झालेल्या चर्चेवेळी पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते. आता शनिवारच्या निर्णयाकडे
सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे.