1000 किलो स्फोटकांसह संशयित जाळय़ात
दौसा / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयाच्या दोन दिवस आधी राजस्थानच्या दौसामध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटके मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान 1000 किलो स्फोटके भरलेले एक वाहन आढळून आले. पोलिसांनी स्फोटके आणि वाहन जप्त करून आरोपी राजेश मीणा याला अटक केली. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथक घटनास्थळी पोहोचले होते.
पोलिसांनी जप्त केलेल्या पिकअपमधून 65 इलेक्ट्रिक डिटोनेटर, 360 स्फोटक गोळे आणि 13 कनेक्टिंग वायर्ससह स्फोटके जप्त केली आहेत. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. ही स्फोटके कुठून आणण्यात आली आणि कुठे पोहोचवली जाणार होती यासंबंधीचा तपास केला जात आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने ही स्फोटके खाणकामासाठी घेतल्याचे सांगितले असले तरी पंतप्रधानांच्या दौऱयामुळे पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या सोहना दौसा विभागाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी धनावद येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. या कार्यक्रमापूर्वीच स्फोटके मिळाल्याने पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. पंतप्रधानांच्या दौऱयाबाबत दक्षता घेतली जात आहे. एसपीजीने पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे ठिकाण आपल्या संरक्षणात घेतले आहे.









