दुबई / वृत्तसंस्था
साखळी फेरीअखेर पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य समोर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आज (गुरुवार दि. 7) आपल्या शेवटच्या आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध वर्चस्व गाजवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. धोनीच्या नेतृत्वाखालील बलाढय़ चेन्नईला यापूर्वी मागील सलग 2 सामन्यात पराभव पत्करावे लागले असले तरी येथे तुलनेने कमकुवत पंजाबविरुद्ध लढतीत विजयाच्या ट्रकवर पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघातील ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
यापूर्वी मागील हंगामात चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. यंदा मात्र प्ले-ऑफसाठी सर्वप्रथम पात्रता निश्चित करत त्यांनी याची पुरेपूर भरपाई करण्याचा प्रयत्न केला. चेन्नईचे फलंदाज उत्तम बहरात असून ऋतुराज गायकवाडचा फॉर्म त्यांचे मुख्य बलस्थान आहे. ऋतुराज व फॅफ डय़ू प्लेसिस आघाडीला तर अम्बाती रायुडूने मध्यफळीत लक्षवेधी योगदान दिले आहे. रविंद्र जडेजाने आपले अष्टपैलूत्व सातत्याने अधोरेखित केले आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबला यंदा असातत्याचा बराच फटका बसला असून सध्या ते गुणतालिकेत 10 गुणांसह सहाव्या स्थानी फेकले गेले आहेत. दस्तुरखुद्द कर्णधार केएल राहुल 528 धावांसह ऑरेंज कॅपच्या यादीत आघाडीवर आहे. शिवाय, त्याचा कर्नाटक राज्य संघातील सहकारी मयांक अगरवालच्या खात्यावर 429 धावा आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमी (13 सामन्यात 18 बळी) व अर्शदीप सिंग (16 बळी) यांनी बरेच यश प्राप्त केले. रवि बिश्नोईला मात्र काही सामन्यातून व़िश्रांती दिली जाणे आश्चर्याचे ठरले आहे.
संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरि निशांत.
पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, शाहरुख खान, मोहम्मद शमी, नॅथन इलिस, आदिल रशिद, मुरुगन अश्विन, हरप्रीत ब्रार, मोईसेस हेन्रिक्यूज, ख्रिस जॉर्डन, एडन मॅरक्रम, मनदीप सिंग, दर्शन नळकांडे, प्रभसिमरन सिंग, रवि बिश्नोई, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार, जलज सक्सेना.
सामन्याची वेळ ः दु. 3.30 वा.









