माजी मंत्री राणा सोढी भाजपमध्ये दाखल
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राणा गुरमीत सोढी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब भाजपचे प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
राणा सोढी हे मागील काही काळापासून काँग्रेसवर नाराज होते. ते कॅप्टन सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. कॅप्टन अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आल्यावर त्यांचे मंत्रिपद काढून घेतले गेले होते. तेव्हापासून त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून अंतर राखले होते.
पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या जागी चरणजीत चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांची भेट घेतली होती. यात राणा सोढी देखील सामील होते. पक्षात योग्य स्थान आणि सन्मान मिळेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण सोढी यांना कुठलीच जबाबदारी देण्यात आली नव्हती.
राणा सोढी हे 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवू शकतात. ते सध्या गुरुहरसहायचे आमदार आहेत. परंतु त्यांनी फिरोजपूर शहरातूनही निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. गुरुहरसहाय मतदारसंघातून ते चारवेळा निवडून आले आहेत. आगामी निवडणुकीत स्वतः फिरोजपूर मतदारसंघातून उभे राहत मुलगा अनुमीत सिंह हीरा सोढी किंवा मुलगी गायत्री बेदी यांच्यापैकी एकाला गुरुहरसहायची उमेदवारी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.









