वार्ताहर/ झुआरीनगर
सांकवाळ ग्रामपंचायतीने स्वेच्छा बंदच्या केलेल्या आवाहनाला झुआरीनगर व आसपासच्या भागात चांगला प्रतिसाद लाभला. झुआरीनगरातील दाट वस्तीत कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत शनिवारपासून नागरिकांनी सात दिवस स्वेच्छा बंद पाळण्याचे आवाहन केले होते. या बंदला यश आले.
उपासनगर गृहनिर्माण वसाहत, झुआरीनगर, झरीन तसेच एम.ई.एस. कॉलेज जवळील भागाचा या स्वेच्छा लॉकडाऊनमध्ये समावेश आहे. झुआरीनगरात औषधालये सोडल्यास जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, फळ भाज्यांचे गाळे बंद ठेवण्यात आले आहेत. झुआरीनगर ते वास्को व वेर्णा औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱया प्रवासी बसेस चालू होत्या. झरीन भागात या लॉकडाऊनला अल्प प्रतिसाद लाभला. या भागात काही दारूची दुकाने व भाज्यांचे गाळे सुरू असल्याचे आढळले. सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील कारखाने व कार्यालये खुली होती. झुआरीनगरात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी स्वेच्छा लॉकडाऊन व इतर सर्व नियम पाळून सर्वांनी सहकार्य करावे असे पंचायतीतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. झुआरीनगरात कोरोनाबाधित व्यक्ती सापडू लागल्याने या भागात चिंता पसरलेली आहे. या गंभीर समस्येविषयी चर्चा व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सांकवाळ पंचायतीने शुक्रवारी उपसरपंच कविता कमल यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेतली होती.
या बैठकीत पंच सदस्य रमाकांत बोरकर, नारायण नाईक, तुळशिदास नाईक, नंदिता देसाई, सतीश पडवळकर, गोविंद लमाणी व आरिष कादर हे पंच सदस्य उपस्थित होते. झुआरीनगरातील दाट वस्तीत तसेच आसपासच्या भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सात दिवस सर्व लोकांनी स्वत:हून लॉकडाऊन करावे. त्याच बरोबर शारीरीक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, निर्जंतुकीकरण करणे असे नियम स्वत:हून पाळावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. एखादा संशयीत आढळल्यास त्याची माहिती पंचायत सदस्य, डॉक्टरांना द्यावी असे आवाहनही पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
झुआरीनगरात पंधरा हजारापेक्षा जास्त लोक राहतात. जर या रोगाचा फैलाव या वस्तीत झाला तर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल व वैद्यकीय यंत्रणा येथील परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडेल. सरकारनेही हा विषय गांभिर्याने घेऊन झुआरीनगरात जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी डॉक्टर व इतर कर्मचारीवर्गाची संख्या वाढवावी असे माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनी म्हटले आहे.
झुआरीनगर ही दाट वस्ती असल्याने सरकारकडे या भागात जलद गतीने चाचण्या कराव्यात अशी मागणी पंच सदस्य तुळशिदास नाईक यांनी केली. झुआरीनगरात जे कोरोनाबाधित सापडलेले आहेत ते झुआरी कंपनीचे कंत्राटी कामगार आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबातील लोकांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य खात्याकडून चाचणी करण्यात आलेली आहे असे पंच सदस्य सतीश पडवळकर यांनी सांगितले.









