प्रतिनिधी / मडगाव:
मडगावातील न्यू मार्केटमधील व्यापाऱयांनी स्वेच्छा लॉकडाऊन कमी करण्याच्या मागणीनंतर आता आळीपाळीने दुकाने एक दिवस बंद व एक दिवस खुली ठेवण्याची अट मागे घेण्याची मागणी उचलून धरली आहे. नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांना हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा असे सूचित केले असता जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सोमवारपर्यंत विचार करून आवश्यक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुरुवारी न्यू मार्केटमधील व्यापाऱयांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आळीपाळीने दुकाने खुली व बंद ठेवावी लागत असल्याने ग्राहक गमवावे लागत असून व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा केला. व्यापाऱयांच्या सहय़ा असलेले एक निवेदन त्यांनी नगराध्यक्षांना सादर केले. त्यानंतर नगराध्यक्षा नाईक यांनी जिल्हाधिकारी रॉय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व व्यापाऱयांची मागणी त्यांच्या कानावर घातली तसेच व्यापाऱयांच्या प्रतिनिधीमंडळासह त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागून घेतली.
मार्केट निरीक्षकांद्वारे सर्वेक्षणाची सूचना
सायंकाळी रॉय यांची भेट घेऊन नगराध्यक्षा व व्यापाऱयांनी आपआपली बाजू त्यांच्यासमोर मांडली. सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न असल्याने यावर विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता जिल्हाधिकाऱयांनी व्यक्त केली. यावेळी मार्केट निरीक्षकांना मार्केटचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यास सांगावे असे नगराध्यक्षांना सूचित करण्यात आले.
दोनच प्रवेशद्वारे खुली ठेवावी लागतील
नगराध्यक्ष नाईक यांनी सर्व दुकाने खुली केल्यास मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडेल, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे फक्त दोन प्रवेशद्वारे खुली करून अन्य बंद ठेवावी लागतील व मार्केट निरीक्षक व कर्मचाऱयांना प्रवेशद्वारावर तसेच बाजारपेठेत तैनात करावे लागेल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
नवीन गटाचा पुढाकार
न्यू मार्केट परिसरामधील एका हॉटेलमालकाचा कोविडमुळे बळी गेला होता. या हॉटेलातील अन्य तिघे तसेच अन्य एक दुकानदार व गाडाचालक कोविडबाधित सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आठ दिवस व्यापारी संघटनांनी स्वेच्छेने मार्केट बंद केले होते. त्यातील एका संघटनेने चार दिवस स्वेच्छा लॉकडाऊन वाढविण्याचे केलेले आवाहन दुसरी संघटना व बहुतेक व्यापाऱयांच्या पचनी पडले नव्हते. येथील व्यापाऱयांच्या नव्या गटाने नगराध्यक्षांना मार्केट खुले करण्यास भाग पाडले होते. आता हा नवीन गटच पुढाकार घेऊन आळीपाळीने दुकाने उघडण्याची पद्धत बंद करण्याची मागणी उचलून धरताना दिसत असून यात दोन्ही संघटनांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









