व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिलेली माहिती : आळीपाळीने दुकाने खुली ठेवण्याच्या अटीमुळे व्यवसायावर परिणाम, बेकायदा भरणाऱया बाजारात मात्र सर्व नियम धाब्यावर
प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील न्यू मार्केट तसेच गांधी मार्केट या दोन्ही बाजारपेठांमधील दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आळीपाळीने खुली करण्यात येत आहेत. मात्र आज मंगळवारपासून न्यू मार्केटने सर्व दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांच्याशी विचारणा केली असता बाजारपेठेबाहेरील दुकाने दैनंदिन खुली ठेवण्यात येतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाजारपेठेत पिवळी व पांढरी रेषा मारून आळीपाळीने दुकाने खुली ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मागील सुमारे तीन महिने आम्ही नियम पाळत आले आहोत. मात्र आता हे जास्तच झाले आहे. कारण आमच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहे, असा दावा शिरोडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला.
पहाटे भरणाऱया बाजारात नियम धाब्यावर
पहाटे 3 ते 7 पर्यंत पिंपळकट्टा चौक ते लिली गार्मेन्टपर्यंत बाजार भरत असतो. यावेळी सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे तसेच मास्क घालण्याचे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. तरीही पालिका व पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. मास्क न घातल्यास बाजारपेठेच्या आत दंड दिला जातो. मात्र पहाटे भरणाऱया बाजारात मास्क न घालता सगळे व्यवहार होत असल्याचे शिरोडकर यांनी नजरेस आणून दिले.
नियम केवळ बाजारपेठेतील व्यापाऱयांना
सकाळी 7 नंतर वाहनांमध्ये साहित्य ठेवून रस्ते व पदपथांवर बेकायदेशीररीत्या व्यवसाय होत असतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सरकार सीमा खोलून सर्वांना आत घेत आहे. नियम मात्र बाजारपेठांतील व्यापाऱयांच्या माथी मारण्यात येत असतात, अशा शब्दांत शिरोडकर यांनी संताप व्यक्त केला.
पालिकेकडून भाडे वा करात सूट नाही
पालिकेने एक दिवस दुकाने आळीपाळीने बंद ठेवावी लागतात म्हणून न्यू मार्केटमधील व्यापाऱयांना भाडेपट्टीत वा अन्य करांमध्ये सूट दिली नसल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. व्यवसायाला मारक ठरत असल्याने आज मंगळवारपासून न्यू मार्केटमधील सर्व दुकाने खुली ठेवण्यात येणार असल्याची कल्पना आपण मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांना दिलेली आहे, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली.









