प्रतिनिधी/ बेळगाव :
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये वकील वगळता इतरांना प्रवेश देण्यावर निर्बंध घातले गेले आहेत. वकिलांनीही आता सतर्कता बाळगली आहे. न्यायालयात वकिलांना थर्मल स्क्रिनिंग करूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. बेळगावमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा धास्ती वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा अधिक दक्षता न्यायालयात घेण्यात येत आहे.
1 जूनपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. वकिलांना खटला दाखल करणे तसेच त्याबाबत युक्तिवाद करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. पक्षकारांना मात्र न्यायालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. पक्षकारांना प्रवेशद्वारासमोरच थांबून राहावे लागत आहे. त्यामुळे मोठी गर्दी होत आहे.
गुरुवारपासून थर्मल स्क्रिनिंग करूनच वकिलांनाही प्रवेश देण्यात येत आहे. याचबरोबर न्यायधीशांचेही थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. एकूणच याबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.









