प्रतिनिधी / कोल्हापूर
नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघा तरुणींनी कोल्हापुरातील तरुणास 6 लाख रुपयांचा गंडा घातला. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाईन विक्री केल्यास भरघोस कमिशन देण्याचे अमिश त्या तरुणींनी दाखवले. याबाबतची फिर्याद अभिनव निवास साळोखे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. यानुसार शाणी आणि गांधी अनेशा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 23ऑक्टोबर रात्री 8 वाजे पर्यंत अभिनव साळोखे यांच्या मोबाइलवर एक मॅसेज आला. यामध्ये पार्ट टाईम काम करून दिवसाला 800 ते 3 हजार कमवा असा मजकूर होता. हा मेसेज वाचून अभिनव यांनी त्या नंबरवर संपर्क साधला.
संशयित शनी या महिलेने आपण ऑनलाईन खरेदी विक्रीच्या कंपनीत मॅनेजर असून तुम्हाला कमिशनवर व्यवसाय देतो असे सांगितले. तसेच काही ऑर्डर देऊन कमिशन देऊन अभिनव यांचा विश्वास संपादन केला. तसेच ऑनलाईन कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून 6 लाख रुपये भरून घेतले. यानंतर अभिनव यांनी या दोन महिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता दोनीही फोन बंद लागले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतत त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली.