अलीकडच्या काळात इंधन आणि उर्जेचे दर जागतिक पातळीवर कमालीचे वाढलेले दिसतात. या दरवाढीचा परिणाम बऱयाच देशात सार्वत्रिक महागाई भडकण्यात झाला आहे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस ज्याला तांत्रिकदृष्टय़ा नैसर्गिक वायू असे संबोधले जाते. त्याचे दरही गगनास भिडल्याने मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या, इंधनांना नवे पर्याय पुढे येत आहेत. सौर ऊर्जा, विद्युत चलित वाहने, गतिमान सायकल सदृश्य वाहने, वाढती सार्वजनिक परिवहन व्यवस्था असे त्यांचे स्वरुप आहे. तथापि, नैसर्गिक वायूस सद्यकाळात ठोस आणि स्वस्त असा पर्याय जो सार्वत्रिक मागणी पुरी करू शकेल, तो दृष्टीपथात नाही. दुसरी गोष्ट अशी की काही वर्षापूर्वी नैसर्गिक वायूच्या बाजारपेठेतील बदलांचा परिणाम हा मर्यादित भौगोलिक क्षेत्रावरच होत असे. याचे कारण या काळात या क्षेत्रातील बाजारस्थिती ही बऱयापैकी स्थिर असलेल्या दीर्घकालीन कंत्राटांवर अवलंबून होती. अशी कंत्राटे पुरवठा स्रोत, स्थळ आणि दरपत्रक नियंत्रित करीत. कंत्राटांची मूळ बांधणीच अशी असे की जेथे मोठे फेरबदल अशक्मय असत. आज ही बाजारपेठीय स्थिती बदलली आहे. आजची नैसर्गिक वायुची बाजारपेठ ही जागतिक, एकात्म आणि त्याचबरोबर कमालीची लवचिक बनली आहे. त्यामुळेच एका भागात जे घडते त्याचे परिणाम साऱयाच भौगोलिक क्षेत्रावर सार्वत्रिकपणे होत जातात. एक प्रकारे हा प्रगत जागतिकीकरणाचा आणि तंत्रवैज्ञानिक विकासामुळे अत्यंत जवळ आलेल्या जगाचा प्रकट अविष्कार आहे.
या पार्श्वभूमीवर सद्यकाळात नैसर्गिक वायूचे दर वाढण्यास कोणती कारणे जबाबदार आहेत आणि भविष्य काळात या क्षेत्राची स्थिती काय असेल हे पहाणे महत्त्वाचे आहे. जेव्हा कोरोनाच्या काळात जगभर प्रवासावर निर्बंध घातले गेले त्या काळात नैसर्गिक वायू व अन्य ऊर्जा स्रोताचे दर तुलनेत स्वस्त होते पण कोरोनाच्या प्रमाणात घट झाल्याने अलीकडच्या काळात जग प्रवासास खुले झाले. अर्थव्यवस्थाही गती घेऊ लागली. अशावेळी नैसर्गिक वायूसह अन्य उर्जा स्रोतांसाठीची मागणी कितीतरी पटीत वाढली आणि त्याचबरोबरीने दर देखील वाढू लागले. विशेषतः युरोप आणि अशियात उल्लेखनिय दरवाढ झाली. नैसर्गिक वायूसारख्या ऊर्जा स्रोतांच्या उत्पादन क्षेत्रात जे उत्पादक होते, त्यांना देखील लॉकडाऊन काळाचा फटका बसला होता. हा काळ मागे पडून आकस्मिकपणे मागणीने जोर धरल्याने या मागणीस तोंड देण्यास उत्पादकांनी दर वाढवले. अगदी नैसर्गिक वायूचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश अमेरिकेनेही दरवाढ केली. अलीकडच्या काळात विजेच्या उत्पादनासाठी, जगातील अनेक देशांनी वीज निर्मितीसाठी पारंपरिक दगडी कोळसा वापरण्याचे सोडून नैसर्गिक वायू हा पर्याय स्विकारला. (यासाठी जागतिक तापमान वाढ आणि कर्बवायू उत्सर्जन संदर्भातील नियमावली आणि संकेतही जबाबदार ठरले.) या बदलामुळे नैसर्गिक वायूच्या मागणीत वाढ होतच गेली. दुसरीकडे नैसर्गिक वायुच्या उत्पादन प्रक्रियेत जे प्रदूषण होते ते टाळण्यासाठी युरोपमधील अनेक देशांनी आपले उत्पादन प्रकल्प बंद केले. परिणामी युरोपातून होणारे नैसर्गिक वायूचे उत्पादन मागणीस न्याय न देण्याइतपत घटले. 2005 साली जे उत्पादन 300 अब्ज घनमीटर्स होते ते 2021 पर्यंत 200 अब्ज घन मीटर्स इतके खाली उतरले.
युरोप खंडातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक देश नार्वे येथील उत्पादन देखील घटल्यामुळे संपूर्ण युरोपवर आता रशियाच्या पुरवठय़ावर अलंबून राहण्याची वेळ आली आहे. पण रशियाकडूनदेखील सध्या मागणीप्रमाणे पुरवठा होताना दिसत नाही. यापूर्वी युपेन आणि पोलंडमधून जाणाऱया पाईप लाईनमधून रशिया युरोपियन देशांना नैसर्गिक वायू पुरवत असे. मात्र आता रशियाने नॉर्ड स्ट्रीम-2 नावाची नवी पाईपलाईन जी रशियातून थेट जर्मनीस जोडते तिथे निर्माण केली आहे. तथापि, युरोपियन संघाच्या अधिकाऱयांनी अद्याप या नव्या पाईपलाईनद्वारे पुरवठय़ास मंजुरी न दिल्यामुळे पुरवठा रेंगाळला आहे. या पाईपलाईनमुळे युरोपवरील रशियाचा प्रभाव वाढेल. यासाठी असलेला अमेरिकेचा विरोध हे रशिया-युरोप नव्या पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा कार्यान्वित न होण्याचे एक मुख्य कारण आहे.
आशियातील भारत आणि चीनसारख्या मोठय़ा देशात सध्या दगडी कोळशाचा तीव्र तुटवडा आहे. भारतातील दगडी कोळशावर चालणारे प्रकल्प बऱयाचअंशी थंडावले आहेत. विद्युत शक्तीच्या निर्मितीसाठी भारत मोठय़ा प्रमाणावर आतापर्यंत दगडी कोळशावर अवलंबून होता. परंतु तुटवडा, प्रदूषण व इतर कारणांमुळे पर्याय म्हणून तो नैसर्गिक वायूकडे वळत असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे. चीनची परिस्थितीदेखील या संदर्भात फारशी वेगळी नाही. याचबरोबरीने युरोप, आणि अमेरिकेतील हवामान बदल, ब्राझील आणि चीनमधील अवर्षणामुळे जलविद्युतशक्तीत झालेली घट, उत्तर सामुद्री प्रदेशातील प्रतिकूल वाऱयांमुळे वायू उर्जेत निर्माण झालेला तुटवडा हे सूक्ष्म घटकही नैसर्गिक वायूचा वापर, मागणी आणि पर्यायाने दर वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत.
या परिस्थितीवर नियंत्रण घालून नैसर्गिक वायूचे दर आटोक्मयात कसे आणावेत हा सद्यकालीन यक्ष प्रश्न जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावत आहे. इंधन क्षेत्रातील ओपेकसारख्या संस्था हैड्रोजन वायूच्या निर्मितीकडे सध्या यामुळे वळलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे जेथे शक्मय असेल तेथे छोटे-मोठे जलविद्युत, सौर ऊर्जा, वायू ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक वाढवून नैसर्गिक वायूच्या मागणीवरील ताण कमी करणे, वायू बचतीची नवी प्रणाली आणि तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक पातळीवर हरीत उर्जेच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे प्रयत्नशील राहून या संदर्भात परस्परांस सहकार्य करणे असे सारे पर्याय तातडीने अंमलात आणण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. विकासाच्या ओघात नैसर्गिक स्रोतांचा वाढता वापर अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करतो याचे उदाहरण नैसर्गिक वायूच्या चढत्या दरानी दाखवून दिले आहे. नैसर्गिक स्रोतांचा वाढता वापर हा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर कोणते परिणाम करतो हे याआधीच सिद्ध झाले आहे. तेल असो वा नैसर्गिक वायू पृथ्वीच्या गाभ्यातील त्यांचे साठे आणि मानवी गरजा यातील समिकरणे आधुनिक काळात बिघडलेली दिसतात. यासाठीच पर्यावरण पूरक शाश्वत विकासासाठी नवनवे प्रयोग आणि संकल्पना उदयास येऊन त्यांच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन मिळण्याची गरज सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे. अनिल आजगांवकर








