प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी 312 डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केले आहे. एकूण 2 हजार 400 रुग्णांवर उपचार करणे शक्मय होणार आहे. हुबळी, म्हैसूर व बेंगळूर येथील वर्कशॉपमध्ये हे वॉर्ड तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयसोलेशनसाठी हॉस्पिटल्स कमी पडल्यास या डब्यांचा वापर केला जाणार आहे.
रेल्वे वैद्यकीय विभाग व आयुष्मान भारत यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे काम करण्यात येत आहे. कोरोनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने आयसोलेशन वॉर्डची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे रेल्वेतील स्लिपर कोचचा वापर आयसोलेशन वॉर्डसाठी करण्यात येत आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी येथे 120, म्हैसूर येथे 120 तर उर्वरित बेंगळूर येथे वॉर्ड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
प्रत्येक बोगीमध्ये 18 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. दोन रुग्णांमध्ये प्लॉस्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने औषध, ऑक्सिजन, स्टोअर रूम यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आंघोळीसाठी बाथरूम व शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेच्या सोयीसाठी 2.5 किलोवॅट क्षमतेचा इन्हर्टर प्रत्येक डब्यात बसविण्यात आला आहे. एका सुसज्ज हॉस्पिटलप्रमाणे याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेनुसार त्या त्या शहरांमध्ये हे वॉर्ड नेता येणार आहेत.
7 हजार मास्क व 1200 लिटर सॅनिटायझरची निर्मिती
नैर्त्रुत्य रेल्वेने कोरोना आपत्तीच्या काळात एकूण 7 हजार मास्क तयार केले आहेत. तर 1200 लिटर सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आहे. यात हुबळी विभागात 450 मास्क तर 220 लिटर सॅनिटायझरची तसेच हुबळी वर्कशॉप येथे 1245 मास्क तर 400 लिटर सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.









