नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱया आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेसाठी कतारचा संघ भारतात सर्वप्रथम दाखल झाला आहे. ब्राझील व युकेचे संघ शुक्रवारी येत असून त्यांच्यासाठी 7 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन असणार आहे. कतारच्या पथकात 6 नेमबाज व साहायक पथकातील सदस्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत तब्बल 40 हून अधिक देशांचे संघ सहभागी होणार असून रायफल, पिस्तोल, शॉटगन शुटर्ससाठी 30 इव्हेंट्समध्ये ही स्पर्धा रंगत जाणार आहे. ही स्पर्धा दि. 18 ते 29 मार्च या कालावधीत होईल.
ब्राझील व युकेमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर असल्याने त्यांच्या पथकाला कडक क्वारन्टाईन झेलावे लागेल, हे निश्चित आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विदेशी संघांना प्रदीर्घ क्वारन्टाईनला सामोरे जावे लागणार नाही, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वी जाहीर केले होते. भारताचे पथक 57 सदस्यांचे असून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केलेल्या अंजुम मोदगिल, दिव्यांश सिंग पनवर, मनू भाकर, सौरभ चौधरी यांचा त्यात प्राधान्याने समावेश आहे. ब्राझील, युकेसह द. कोरिया, सिंगापूर, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड, तुर्कीचे संघ सहभागी होणार आहेत तर चीन, जपान, जर्मनी, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कुवेत, मलेशिया हे देश आपला संघ पाठवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.









