प्रतिनिधी/ वडूज
सातारा, सांगली जिह्यातील काही गलाई बांधव नेपाळ या देशात गेली अनेक वर्षे व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे हे गलाई बांधव चांगलेच अडचणीत आले होते. त्यांचा तेथील व्यवसाय बंद होण्याबरोबर भारतात येण्यासही बरेच अडथळे येत होते. उत्तरप्रदेश मराठी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे ‘ त्या ’ बांधवांना मायदेशात येण्याची वाट मोकळी झाली आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्या गाडय़ा गावामध्ये पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बरेच दिवस झाले नेपाळ मधील मराठी समाजातील परिवार कोरोना संकटामुळे बिकट परिस्थितीला सामोरे जात होते, वेगळा देश असल्यामुळे अडचन निर्माण झाली होती. तेथील हणमंत चव्हाण, गोरखनाथ पानसकर, नवनाथ साळुंखे, शंकर शेळके व प्रशांत बाबर यांनी खटाव तालुक्यातील निमसोडचे सुपुत्र व उत्तर प्रदेश मराठी समाज संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर, कोषाध्यक्ष गजानन पाटील यांच्याशी संपर्क केला. संघटनेचे संस्थापक उमेशआण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळमधील गलाई व्यवसायिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. तद्नंतर श्री. देवकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. हा पाठपुरावा करत असताना माजी सभापती श्री संदीप मांडवे, खानापूरचे शिवसेना आमदार अनिलभाऊ बाबर, संरक्षक श्री माणिकराव पाटीलजी (आप्पा) व वरिष्ठ महामंत्री श्री पांडुरंग राऊत यांचेही चांगले सहकार्य झाले. सर्व पाठपुराव्यानंतर वरिष्ठ स्तरावरुन नेपाळमधील भारतीय दूतावासाबरोबर योग्य ती चर्चा होवून भारतीय गलाई व्यवसायिकांना मायदेशात परतन्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे 260 गलाई बांधव आज मायभूमी मध्ये यायला निघाले. ते नेपाळची राजधानी काठमांडू येथून उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे येणार आहेत व तिथून त्यांना गावी आणण्यासाठी सांगली हून ट्रव्हल बसेस रवाना झाल्या आहेत. त्या गाडय़ांना सांगली डी. एम. चे परमिशन मिळवून देण्यासाठी आमदार श्री अनिल भाऊ बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.








